Maharashtra Politics Ajit Pawar:  महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात तत्कालीन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायलयाने ताशेरे ओढले होते. आज, अजित पवार (Ajit Pawar) यांनीदेखील राष्ट्र्वादी काँग्रेस (Nationalist Congress Party) महायुतीत सहभागी होत असल्याचा दावा करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, अजित पवार यांच्या शपथविधीवर प्रश्न निर्माण झाला आहे. पक्षाच्या विधीमंडळ गटनेत्याच्या पत्राशिवाय शपथ दिली का, याची चर्चा सुरू झाली आहे. जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते आहेत. तर, आधीचे प्रतोद आमदार अनिल पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. 


सरकारला पाठिंबा देण्यासाठी पक्षाच्या गटनेत्याच्या पत्राची आवश्यकता असते. पक्षाचा गटनेता हा पक्षाचा अध्यक्ष ठरवतो. नुकत्याच राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालपत्रात विधीमंडळाचा गटनेत्याची नेमणूक पक्षाचा अध्यक्ष करतो, असे म्हटले होते. मात्र, राष्ट्रवादीचा एक गट सरकारमध्ये स्थापन होत असताना त्यांनी कोणाचे पत्र सादर केले याची चर्चा सुरू झाली आहे. 2019 मधील फडणवीस यांच्यासोबतच्या शपथविधी प्रकरणात अजित पवार हेच विधिमंडळ गटनेते होते. त्यांच्या पत्रानंतर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अजित पवार यांनी शपथ दिली होती.


राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी रविवारी, सायंकाळी पत्रकार परिषदेत आमदारांची दिशाभूल करून काही कागदांवर सह्या घेतल्याचा दावा केला होता ती नेमकी कोणती कागदपत्रे होती, याचा उलगडा अद्याप झाला नाही. 


अजित पवारांसह 9 आमदांवर अपात्रतेची कारवाई सुरू 


राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ जणांची शपथविधी ही बेकायदेशीर असून त्यांना अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची महत्वपूर्ण माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची कृती बेकायदेशीर आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना अंधारात ठेऊन केलेली कृती आहे. एका सदस्याने याची तक्रार केली असून ती शिस्तपालन समितीकडे पाठवण्यात आली आहे. 


जयंत पाटील म्हणाले की, आज आम्ही सर्व माहिती घेऊन प्रक्रिया सुरू केली आहे. नऊ जण म्हणजे पक्ष नव्हे. त्यामुळे या नऊ जणांना आता अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पक्षविरोधात कारवाई केल्याने या नऊ जणांवर कारवाई करण्यात येणार आहे. पक्षाच्या अध्यक्षाला न सांगता केलेली ही कृती होती. यासंबंधित आता विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना मेल केला असून त्यांनी आम्हाला लवकरात लवकर बोलवावं. या 9 जणांच्या विरोधातच ही कारवाई असेल. पक्षात असून त्यांनी पक्ष विरोधी कारवाई केली आहे. 


अजित पवारांचा राष्ट्रवादीवर दावा


शपथविधीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हा निर्णय वरिष्ठांची चर्चा करुनच घेतला असल्याचे सांगितले. अजित पवारांच्या या निर्णायाला शरद पवार यांचा पाठिंबा आहे का ? असा सवालही यामुळे उपस्थित झाला आहे. अजित पवार यांच्या बंडावर अद्याप शरद पवारांची कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच यापुढील सर्व निवडणुका घड्याळ या चिन्हावर लढणार असल्याचेही सांगितले. राज्याचे हित पाहून निर्णय घेतला असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.