3rd July Headlines:  सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींना पार्श्वभूमीवर शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मनसे नेत्यांची बैठक बोलावली आहे. तळ कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात 3 जुलैनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. अतिक अहमद आणि अशरफ हत्या प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. 


शिंदे गटाची बैठक


मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली बाळासाहेब भवन येथे महत्त्वपूर्ण बैठक पार दुपारी चार वाजता पार पडणार आहे. या बैठकीच्या आधी दोन वाजता मुख्यमंत्री आणि सर्व आमदार खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत.  त्यानंतर बाळासाहेब भवनामध्ये शिंदे गटाच्या सर्व नेत्यांची,आमदारांची, खासदारांची आणि मंत्र्यांची बैठक होणार आहे. 


शरद पवार कराड दौऱ्यावर 


पक्षात पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन कराडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन ते दर्शन घेणार आहेत. तर कराडमध्ये शरद पवार हे सभा देखील घेणार आहेत. 


राज ठाकरेंनी बोलावली मनसे नेत्यांची बैठक


अजित पवारांनी शिवसेना भाजप बरोबर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांची बैठक सकाळी दहा वाजता बोलावली आहे. 


यवतमाळमध्ये जन आक्रोश मोर्चाचे आयोजन 


राज्यात 55 हजार शिक्षकांची भरती घेण्यात यावी या मागणीसाठी टीइटी उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांचा जनआक्रोश मोर्चा होणार आहे. हा मोर्चा शिवाजी मैदानातून जिल्हा परिषदेवर धडकणार आहे.


उद्या राज्यात गुरुपौर्णिमेचा उत्साह


राज्यात गुरुपौर्णिमेचा उत्साह असणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  दुपारी 12 वाजता आनंदाश्रम आणि शक्ती स्थळाला भेट देऊन गुरुपौर्णिमा साजरी करणार आहेत. तर शिर्डीतील गुरू पौर्णिमा उत्सवाचा दुसरा दिवस असणार असून हा मुख्य दिवस आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली दुपारी 4.30 वाजता मंत्रिपरिषदेची बैठक होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित रहाणार आहेत.


समान नागरी कायद्यावर स्थायी समितीची बैठक


समान नागरी कायद्यावर आज स्थायी समिती बैठक होणार आहे.ही बैठक दुपारी तीन वाजता होणार आहे.  या बैठकीत समितीच्या सदस्यांना त्यांची मत विचारली जाणार आहेत. तर या समितीचे प्रमुख सुशील मोदी असणार आहेत. 


सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वपूर्ण सुनावण्या पार पडणार 


मणिपूर मधील हिंसाचारा विरोधात मणिपूर ट्राईबल फोरम या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. तर अतिक अहमद आणि अशरफ हत्या प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दोन हजारांच्या नोट बंद करण्याच्या विरोधात सुनावणी होणार आहे.