Eknath Shinde vs Uddhav Thackeray : शिवसेनेच्या बंडखोर गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदर शहरातील शिवसेनेचे 18 विद्यमान नगरसेवक, अनेक प्रमुख पदाधिकारी यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मुख्यंमत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याचा दावा केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी घोषणाही केली होती. मात्र संध्याकाळपर्यंत शिवसेने आमदार प्रताप सरनाईक यांचा दावा खोटा असल्याचं सांगितलं.  19 नागरसेवकांपैकी फक्त आठ नगरसेवक आमदार प्रताप सरनाईकांसोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असल्याचे शिवसेनेचे मिरा भाईंदरचे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हाञे यांनी सांगितलं आहे. काही नगरसेवक गेले असले तरी 10 ते 11 नगरसेवक आजही उध्दव ठाकरेंच्या सोबतच असल्याच सांगितलं आहे. 


मिरा भाईंदर शहरात शिवसेनेच्या अधिकृत चिन्हांवर निवडून आलेले एकूण 22 नगरसेवक होते, त्यापैकी अनिता पाटील आणि दीप्ती भट यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये आधीच प्रवेश केलेला आहे. एक नगरसेवक हरिशचंद्र आमगावकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता सध्यस्थितीत मिरा भाईंदर महानगरपालिकेत शिवसेनेचे एकूण 19 अधिकृत नगरसेवक असून विक्रम प्रतापसिंह हे नामनिर्देशित नगरसेवक आहेत. त्यापैकी फक्त आठ नगरसेवक आमदार प्रताप सरनाईक यांच्यासोबत काल मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्या आठ नागरसेवकांपैकी काहींना दिशाभूल करुन, मुख्यमंञ्याकडे नेलं असल्याचा आरोप केला आहे.  


मुळातच मिरा भाईंदर शहरातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे एकेकाळी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याचे दिसत होते. आणि म्हणूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेच्या प्रवक्ते पदावर त्यांना नियुक्त केले होते. प्रताप सरनाईक राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत आल्या पासूनच एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्यामध्ये गेली अनेक वर्षे शीत युद्ध सुरु असल्याचे बोलले जात होते. मिरा भाईंदर शहरातील विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम असो की, पक्षाचा काही अधिकृत कार्यक्रम असो प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पालकमंत्री असूनही एकनाथ शिंदे क्वचितच त्या कार्यक्रमाला उपस्थित राहात होते. आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागण्यामागचे कारण देखील शिंदे-सरनाईक यांच्यातील वितुष्ट असल्याचे त्यावेळी बोलले जात होते. मग आता अचानक प्रताप सरनाईक यांचे मन परिवर्तन कसे झाले..?   प्रताप सरनाईक उद्धव ठाकरे यांच्याशी बंड करुन एकनाथ शिंदे गटात सामील कसे झाले? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून. शिंदे-सरनाईक यांच्या घनिष्ठ संबंधाचे कारण ईडीचा कारनामा तर नाही ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात केली जात आहे.


मिरारोड-भाईंदर महानगरपालिका उध्दव ठाकरे समर्थक नगरसेवकांची नावे  
1. सौ नीलम ढवण (गटनेता) 
2. श्री प्रवीण पाटील
3. श्री जयंती पाटील
4 श्रीमती तारा घरत
5 सौ स्नेहा पांडे
6 सौ भावना भोईर
7 सौ अर्चना कदम
8 श्री दिनेश नलावडे
9 सौ कटलीन परेरा
10 सौ शर्मिला बगाची