Maharashtra Political Crisis Eknath Shinde: शिवसेनेचे बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे. आमचे कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत, त्यांची नावे सांगावीत असे थेट आव्हान एकनाथ शिंदे यांनी दिले. शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर हे तुम्हाला आमच्या निर्णयाची माहिती देतील असेही त्यांनी म्हटले. आज हॉटेल रॅडिसनच्या प्रवेशद्वाराजवळ येत एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. 


मागील आठवड्यांपासून शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसन मध्ये वास्तव्यास आहेत. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या केंद्रस्थानी असलेले एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये पहिल्यांदाच माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, इथं आलेले 50 आमदारा स्वखुशीने आले आहेत. आम्ही अजूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक असल्याच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. आम्ही या ठिकाणी एक भूमिका घेऊन आलो आहोत. यामध्ये कोणताही स्वार्थ नसल्याचा दावा यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला. 


ठाकरेंना आव्हान


मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या नेतृत्वाकडून गुवाहाटीमध्ये शिंदे यांच्या गटातील 20-21 आमदार संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे आमदार मुंबईत आल्यानंतर पक्षात सहभागी होणार असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी संपर्कात असलेल्या आमदारांची नावे जाहीर करण्याचे आव्हान दिले. कोणताही आमदार बाहेरच्यांशी संपर्कात नसल्याचा दावा त्यांनी केला.   
 


उद्धव ठाकरेंनी पाठवलं की, स्वतःच घेतला निर्णय? उदय सामंत स्पष्टच बोलले


उदय सामंत यांनी स्वतः समोर येत, शिंदे गटात सामील होण्याचं कारण स्पष्ट केलं आहे. गुवाहाटीला गेल्यानंतर पहिल्यांदाच उदय सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 


गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचं जे कारस्थान सहयोगी पक्षांकडून सुरू आहे, त्याला कंटाळून मी गुवाहाटीला आलो, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षानं एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले आणि अखेर उमेदवार पडला, असं म्हणत उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, पुढे बोलताना याच कारणामुळे आपण शिंदे गटात सामील होण्याची भूमिका घेत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.