Maharashtra Political Crisis : सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दोन वेळा फोन केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे-फडणवीस यांच्यात 21 जून रोजी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरेंनी भाजप श्रेष्ठींनाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही, अशी माहितीही सूत्रांनी दिली. शिवसेनेकडून मात्र या सर्व गोष्टी भूलथापा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 


विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, "21 जून आणि त्यानंतरही ठाकरेंनी फडणवीसांना दोन फोन केल्याची माहिती आहे. शिवसेनेचं सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फोन फडणवीसांना फोन केल्याची माहिती आहे. पक्षामध्ये विभाजन होण्यापेक्षा, आसाम गुवाहाटीला गेलेले आणि मुंबईत राहिलेले आमदार, असं विभाजन न होता, हे सर्व एकत्र राहून भाजपसोबत पुन्हा शिवसेनेची युती होते का? यासंदर्भात चर्चा झाल्याचा अंदाज असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. 


पाहा व्हिडीओ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना दोन वेळा फोन



सध्या राज्यातील सत्तापेच शिगेला पोहोचला असताना या वृत्तामुळं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. यासंदर्भात भाजपकडून अद्याप काहीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण उद्धव ठाकरे हे आता सर्व पर्याय चाचपत असल्याचं बोललं जात आहे. सरकार टिकवण्यासाठी सर्व पर्याय तपासले जात आहेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी गुवाहाटीतील बंडखोर आमदारांना इथे येऊन चर्चा करण्याचं आवाहन केलं होतं. इथे येऊन चर्चा करा, महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबतही विचार करु असंही संजय राऊत म्हणाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत की, सरकार बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याशिवाय उद्धव ठाकरेंची भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी केंद्रीय पातळीवरही चर्चा होत असल्याचं सांगितलं जात आहे. 


या निव्वळ भूलथापा, कोणीही गैरसमज करून घेऊ नये : शिवसेना


सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आहे, अशा बातम्या प्रकाशित होत आहेत. या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव ठाकरे जे बोलायचंय, ते खुलेआम बोलतात. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये, असं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.  


भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत : सुधीर मुनगंटीवार 


भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं वक्तव्य पुन्हा एकदा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. सोबतच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या संवादाची आम्हाला कल्पना नाही, असं स्पष्टीकरणंही त्यांनी दिलं आहे.