Maharashtra Political Crisis Sanjay Raut : शिवसेनेला अनेकदा अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. आता ही आम्ही अग्निपरीक्षा देणार असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले.राज्यातील विधानसभा बरखास्त केली जावी अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली असल्याच्या दाव्याचा पुनरुच्चार ही त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज चर्चा करणार असून सरकारच्या राजीनाम्याबाबत महाविकास आघाडी सरकार एकत्रितपणे निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. 


शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, सध्याच्या राजकीय घडामोडी नेमक्या कोणत्या वळणावर जातील हे सांगता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले. भाजपच्या मदतीशिवाय आमदारांचे अपहरण अशक्य असल्याचे राऊत यांनी सांगितले.आमदार नितीन देशमुख यांनी सांगितलेल्या अनुभवावरून काय झालं असावं याकडे त्यांनी निर्देश केला. शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत आल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचे त्यांनी म्हटले. 


शिवसेनेची अग्निपरीक्षा


सीतेला एकदाच अग्निपरीक्षा द्यावी लागली होती.मात्र, शिवसेनेला अनेकदा अग्निपरीक्षा द्यावी लागली होती.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर शपथा घेणाऱ्यांचीदेखील अग्निपरीक्षा सुरू झाली असल्याचे त्यांनी म्हटले. 


महाविकास आघाडी एकसंध 


राज्यावर ओढावलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी महाविकास आघाडी एकसंध असल्याचे स्पष्ट केले.सरकारच्या राजीनाम्याबाबत महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेतला जाईल असेही राऊत यांनी म्हटले आहे. आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानावर भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 


राऊत यांच्या ट्वीटने खळबळ 


दरम्यान, त्याआधी संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटनं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. संजय राऊतांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत दिले असल्याचं बोललं जात होते. संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट केलंय की, "महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने.."


 






सकाळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, संजय राऊत यांनी शिवसेना संघर्ष करणारा पक्ष आहे. जास्तीत जास्त सत्ता जाईल. सत्ता पुन्हा मिळू शकते, पण पक्षाची प्रतिष्ठा सर्वात वरती आहे, असं भाष्य केलं होतं.