Maharashtra crisis Live : महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासूनच हे सरकार पडावे यासाठी दररोज देव पाण्यात घालून बसलेल्या भाजपला आता सरकार पाडण्याची आयतीच संधी चालून आली आहे. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने राज्यात विचित्र परिस्थिती राज्यांमध्ये निर्माण झाली आहे. शिंदे यांच्या बंडाळीला भाजपकडून गेल्या अनेक दिवसांपासून पुरेपूर रसद पुरवण्यात आली आहे. दिल्लीतून स्वत: गृहमंत्री अमित शहा यामध्ये सक्रीय आहेत. त्यामुळे राज्यातील शिवसैनिकांचा पारा चांगलाच चढला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व भाजप कार्यालयांना पोलिस सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
महाविकास आघाडी सरकार आल्याने या संधीचा फायदा घेण्यासाठी भाजपने पूर्ण तयारी केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून भाजपची यंत्रणा त्यासाठी कार्यरत आहे. आमदार संजय कुटे हे स्वतः एकनाथ शिंदे यांना सुरतमध्ये हॉटेलमध्ये भेटले होते. शिवसेना आमदारांना सुरतवरून गुहावटीमध्ये येण्यासाठी मोहित कंबोज यांची पळापळ दिसून आली होती. हे सरकार पाडण्यासाठी भाजप ने जे काही करता येईल ते सर्व पणाला लावून करण्यास सुरुवात केली आहे.
दुसरीकडे देवेंद्र फडणीस यांनी दिल्लीमध्ये जाऊन भेटीगाठी करून मुंबईत परतले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप कार्यालये शिवसैनिकांकडून लक्ष्य ठरू शकतात ही शक्यता गृहित धरुन राज्यातील सर्व भाजप कार्यालयांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे. शिवसैनिकांचा उद्रेक होऊ शकतो ही शक्यता त्याच्यामागे वर्तवली जात आहे. त्यामुळेच सर्व कार्यालयांना संरक्षण दिल्याचे दिसून येत आहे.
कालपासून शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत, इतकेच नव्हे तर शिवसेना भवनासमोरही बॅनरबाजी सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काही काळामध्ये शिवसैनिकांच्या रागाचा सामना भाजप नेत्यांना किंवा भाजप कार्यकर्त्यांना करावा लागू शकतो, असे बोलले जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : 35 नव्हे तर 40 शिवसेना आमदार माझ्यासोबत, एकनाथ शिंदेंची एबीपी माझाला माहिती
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे गुजरातमध्ये....राजकीय भूकंप महाराष्ट्रात; शिंदेंचे बंड, शिवसेनेची बैठक...काय घडलं दिवसभरात?
- Eknath shinde : मला मंत्री केलं नाही तरी चालेल पण भाजपसोबत सत्ता स्थापन करा... एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
- Devendra Fadanvis : ते पुन्हा येणार?... या पाच कारणांमुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता