मुंबई: बंडखोर आमदार हे सभागृहात येणारच आहेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार आहे, त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल अशी थेट धमकी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना दिली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. बहुमत आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी विधानसभा हा मार्ग आहे, त्यामुळे बंडखोरांना त्यासाठी परत यावंच लागेल असं शरद पवार म्हणाले होते. नारायण राणेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणेंनी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये राणे म्हणतात की, "माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, 'सभागृहात येऊन दाखवा', ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल."
नारायण राणे यांनी एक प्रकारे शरद पवार यांना धमकीच दिल्याने त्याची प्रतिक्रिया आता राजकीय क्षेत्रात उमटत आहे. तसेच नारायण राणे यांनी संजय राऊत यांनाही आव्हान दिलं आहे.
बाहेर गेलेल्या आमदारांना परत यावंच लागेल
शरद पवार म्हणाले होते की, "बाहेर गेलेले आमदार राज्यात परतल्यानंतर शिवसेनेसोबत असतील असा विश्वास वाटतोय. विधानसभेत ज्या वेळी बहुमत चाचणी होईल त्यावेळी समजेल हे सरकार बहुमतात आहे. अशी स्थिती मी महाराष्ट्रात याआधी अनेकदा पाहिली आहे. आताच्या परिस्थितीवर मात करुन हे सरकार कायम राहिल असा विश्वास आहे. जे लोक बाहेर गेले, त्यांच्या नेत्याचं म्हणणं आहे की काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत असल्याने ते नाराज आहेत. मग ही नाराजी या आधी का काढली नाही? हिंदुत्वाचा मुद्दा या आधी का काढला नाही? संजय राऊत यांनी त्यांना इकडे येऊन भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना इकडे यावंच लागेल."