Maharashtra Political Crisis : "आम्ही अजूनही शिसेनेसोबतच आहोत. लवकरच महाराष्ट्रात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे. महाविकास आघाडीतून बाहेर पडलो तर प्लोअर टेस्टची गरज भासणार नाही. राजीनामा न देता उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावं असे सांगत लवकरच भाजप आणि शिवसेनेचे सरकार येईल, असा विश्वास शिवसेनेचे बंडखोर नेते आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. दीपक केसरकर यांनी एबीपी माझासोबत संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडावी. शिवाय राजीनामा न देता त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावं, असे आवाहन दीपक केसरकर यांनी यावेळी केले आहे.
दीपक केसरकर म्हणाले, 'महाराष्ट्रात दाखवले जात आहे ती वस्तूस्थिती नाही. आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत. उद्धव ठाकरे हेच आमचे नेते आहेत. त्यांच्याविषयी आम्हाला आदर आणि प्रेम आहे. त्यांच्याच आर्शीवादाने हे सरकार बनावं. 10 ते 12 आमदार वगळता सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे.
"घरातून एखादा मुलगा बाहेर गेला तर बाहेर पडलेल्यांची समजूत काढली जाते. परंतु, आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. आधी मार्ग काढला असता तर महाविकास आघाडी सरकार टिकलं असतं. परंतु, उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीचे सल्लागार महत्वाचे वाटतात, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
"आम्हाला महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि शिवसेना म्हणून एकत्र निवडूण आणले होते. परंतु शिवसेने वेगळी चूल मांडली. जनमताच्या कौलाप्रमाणे युती सरकार हवं होतं. त्यावेळी भाजपचे लोक रस्त्यावर आले नाहीत. त्यामुळे आता देखील हा निर्णय मान्य केला पाहिजे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
'मातोश्रीवर आरोप करू नयेत'
दीपक केसरकर म्हणाले, "मध्यंतरीच्या काळात मातोश्रीवर अनेक आरोप करण्यात आले. परंतु, मातोश्रीवर कोणीही आरोप करून नयेत. मातोश्री हे संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. भाजप आणि बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध चांगले होते."