मुंबई : शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्गमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात अर्ज करून नॉट रिचेबल असेलले नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी सुरू आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. आज दुपारी तीन वाजता कणकवली (Kankavli) पोलीस ठाण्यात हजर राहण्यात यावे असे पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
नारायण राणे यांना काल पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता की, नितेश राणे सध्या कोठे आहेत? परंतु, ते कोठे आहेत हे मला माहित असेल तरी मी तुम्हाला का सांगावं? असा प्रतिप्रश्न नारायण राणे यांनी पत्रकारांना उत्तर देताना केला होता. नारायण राणे यांच्या याच वक्तव्यावरू त्यांना नितेश राणे कोठे आहेत हे खरंच माहित आहे का? हे जाणून घेण्यासाठी कणकवली पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी नोटीसीतून दिले आहेत.
कणकवली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या कलम 307, 120 ब आणि 34 या गुन्ह्यात नितेश राणे हे आरोपी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अथक प्रयत्न करूनसुद्धा ते मिळून येत नाहीत त्यामुळे त्यांचा शोध सुरू आहे. असे पोलिसांनी नारायण राणे यांना पाठवलेल्या नोटीसीमध्ये म्हटेल आहे.
नारायण राणे यांनी काल केलेल्या वक्तव्यावरूनच त्यांना ही नोटीस पाठवल्याचे पोलिसांनी म्हटेल आहे. "नितेश राणे यांच्यावरील गुन्ह्याबाबत आपण काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह विधाने केली आहेत. शिवाय पत्रकार परिषदेत नितेश राणे यांच्या ठाव-ठिकाणाबद्दल प्रश्न विचाला असता नितेश राणे कोठे आहेत ते सांगायला आम्ही मुर्ख आहोत का? असे वक्तव्य केले. हे वक्तव्य आज वर्तमान पत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यामुळे नितेश राणे यांचा ठाव-ठिकाणा आपणास पूर्णपणे माहित आहे. त्यामुळे पोलिसांची नोटीस मिळताच नितेश राणे यांना पोलिसांमोर हजर करावे, तसेच पत्रकार परिषदेतील वक्तव्यानुसार आपल्याला माहिती असलेल्या गुन्ह्याच्या तपशीलाबाबत जबाब नोंदवण्यासाठी कणकवली पोलीस ठाण्यात हजर राहावे असे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी नारायण राणे यांना पाठवलेल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे.
'पोलिसांची नोटीस योग्यच आहे. नितेश राणे कुठे आहेत हे सांगणार नाही असं नारायण राणे म्हणाले. तसंच संतोष परबला एवढीशी मारहाण झाली असं म्हणत राणेंनी मारहाणीचं समर्थन केलं. केंद्रीय मंत्र्याने असं समर्थन करणे योग्य नाही. नितेश राणे कुठे आहेत हे नारायण राणे यांना माहिती आहे. केंद्रीय मंत्री म्हणून नारायण राणे माहिती लपवू शकतात, पण पोलिसांनी नोटीस पाठवून योग्य निर्णय घेतला आहे," असं शिवसेना आमदार वैभव नाईक म्हणाले आहेत.
दरम्यान, पोलिसांच्या नोटीसीवर सध्या काहीही बोलणार नाही अशी प्रतिक्रीया नारायण राणे यांनी दिली आहे. तर नारायण राणे यांना पाठवलेल्या नोटीसीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. सत्तेचा अहंकार असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
शंभूराज देसाई काय म्हणाले?
माझ्याकडे अधिकृत माहिती नाही, अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी लागेल. संबंधित तपास अधिकाऱ्यांनी नोटीस दिली असेल तर तपासाचा भाग असू शकतो. नारायण राणे यांचं वक्तव्य सर्वांनीच ऐकलं, मला माहिती असेल तरी नितेश राणे कुठे आहेत हे कशाला सांगू? असं नारायण राणे म्हणाले होते. त्याबाबत राणेंना नोटीस पाठवली असू शकते. अशी माहिती गृहराज्यमंत्री संभुराज देसाई यांनी दिली आहे.
नारायण राणेंच्या वक्तव्यावरुन त्यांना नितेश राणे कुठे आहेत हे माहिती आहे. याचा अर्थ पोलिसांना तपास कामात सहकार्य करायला हवं. जर नितेश राणे दोषी नसतील तर त्यांनी पोलिसात जाऊन आपली भूमिका मांडावी. नितेश राणे 3-4 दिवस नॉट रिचेबल का आहेत? ते पोलिसांसमोर येण्याचं का टाळत आहेत? तुम्ही दोषी असाल तर कायद्याप्रमाणे कारवाई होईल, दोषी नसेल तर घाबरण्याचं कारण काय? असा प्रश्न शंभूराज देसाई यांनी उपस्थित केला आहे.
Narayan Rane : नितेश कुठेय ते सांगणार नाही, एका आमदारासाठी एवढा फौजफाटा कशाला? नारायण राणेंचा सवाल, पाहा व्हिडिओ
महत्वाच्या बातम्या