मुंबई: राज्यातील 18,331 जागांसाठी होणाऱ्या पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस (Maharashtra Police Recruitment Last day to apply) आहे. सात ते सात वर्षांपासून शासकीय मेगाभरती निघाली नसल्याने पोलिस भरतीसाठी बुधवारपर्यंत 14.47 लाख अर्ज आले होते. या हिशोबाने एका जागेसाठी 80 ते 85 उमेदवार स्पर्धेत आहेत.
राज्यात जवळपास 75 हजार नोकरभरती करण्यात येणार असून त्यामध्ये 18 हजार 331 जांगांसाठी पोलिस भरती करण्यात येणार आहे. गेल्या सहा ते सात वर्षानंतरची एवढ्या मोठ्या प्रमाणातील ही पहिलीच भरती असल्याने मुलांनी जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसून येतंय. अनेक ठिकाणी मैदानातच मुलं व्यायाम करत आहेत, तसेच मैदानावरच उसळ खात असल्याचं चित्र दिसून येतंय. काहीही होऊ दे, पण आता यावर्षी नोकरी मिळवायचीच असा संकल्प करून मैदानावर ही मुलं घाम गाळत आहेत.
पोलिस भरतीसाठीच्या 18 हजार 331जागांसाठी जानेवारीत मैदानी आणि 15 ते 20 फेब्रुवारीपूर्वी लेखी परीक्षा होईल. उमेदवारांचे जवळपास 15 लाख अर्जांची संख्या पाहता परीक्षांना थोडा वेळ लागू शकतो.
Maharashtra Police Recruitment: पोलिस भरतीसाठी उमेदवारांत मोठी चुरस
दिर्घ काळानंतर भरती सूरू झाल्याने स्पर्धा मोठी असून या भरतीसाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक अशा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक अर्जदार आहेत. या भरतीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अनेक तरुण- तरुणींनी जात संवर्ग, सोयीचा जिल्हा, ज्याठिकाणी स्पर्धक जास्त नसतील याचा अंदाज घेऊन दोन ते तीन ठिकाणी अर्ज भरले आहेत. त्यांना तिन्ही ठिकाणचे प्रवेशपत्र मिळणार आहे. त्यापैकी कोणत्याही एका केंद्रावर त्याला परीक्षा देता येणार आहे. फॉर्म भरायची मुदत संपल्यावर अर्जांची पडताळणी होऊन डिसेंबरअखेरीस सर्व उमेदवारांना परीक्षेचे प्रवेशपत्र वितरित केले जाणार आहे.
ठळक बाबी...
• पोलिस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत शेवटची मुदत.
• जानेवारीत सर्व उमेदवारांची एकाचवेळी सुरु होणार मैदानी परीक्षा, फेब्रुवारी महिन्यात एकाचवेळेस राज्यातील विविध केंद्रावर होईल लेखी परीक्षा.
• मैदानी चाचणीत किमान 40 टक्के गुण अपेक्षित; एका जागेसाठी 10 जणांची होणार लेखी परीक्षेला निवड.
• मेरिट यादीप्रमाणे होणार अंतिम निवडी; काही हरकत असल्यास ती नोंदवण्याचा उमेदवारांना अधिकार.