Maha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) मुंबईतील (Mumbai) महामोर्चासाठी बैठका झाल्या, तयारी अंतिम टप्प्यात आली, बसेस बुक झाल्या मोर्चाचा मार्गही ठरला. पण मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मात्र या मोर्चाला अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे. 17 डिसेंबरला होणाऱ्या या मोर्चासाठी आता मुंबई पोलीस परवानगी देणार का? याकडे महाविकास आघाडीचं लक्ष लागलं आहे.
तीन लाखांहून अधिक कार्यकर्ते जमवण्याचे लक्ष्य
"महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल" या घोषवाक्याखाली महाविकास आघाडी रस्त्यावर उतरत आहे. यासाठी शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी कार्यकर्त्यांना जमवण्यासाठी तयारीला सुरुवात केली आहे. प्रत्येक पक्षाने एक लाखाचं टार्गेट ठेवून जवळपास तीन लाखाहून अधिक कार्यकर्ते जमवण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. या ऐतिहासिक विराट मोर्चासाठी तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरु झाल्या आहे. त्यासोबतच कार्यकर्त्यांना जमवण्यासाठीही प्लॅनिंग करायला सुरुवात झाली आहे. एवढं सगळं सुरु असताना परवानगीचं काय? असा सवाल उपस्ंथित आहे.
भाजप नेते, राज्यपालांविरोधात महाविकास आघाडी आक्रमक
भाजपचे नेते आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा वारंवार झालेला अपमान त्याचप्रमाणे महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा सुरु असलेला प्रश्न या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे.
महामोर्चात कोण कोण सहभागी होणार?
भायखळ्याच्या रिर्चड्सन क्रुडासपासून सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल, त्यानंतर हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने येणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या समोर एका ट्रकवरच सभा आयोजित करण्यात येणार आहे. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाई जगताप आणि इतर नेते उपस्थित असतील. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार,सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि शरद पवार सुद्धा येण्याची शक्यता आहे. डावे पक्ष सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहेत.
मोर्चाला सपा, सीपीआय, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा पाठिंबा
महाविकास आघाडीच्या या मोर्चाला समाजवादी पक्षापासून सीपीआय, मराठा क्रांती ठोक मोर्चा या संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यपाल हटाओपासून शिवाजी महाराजांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याबाबतच्या मागण्या मोर्चात पाहायला मिळणार आहेत.