Omicron Cases In Mumbai : ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्यानंतर मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. डोंबिवली आणि पुण्यानंतर आता मुंबईतही ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केलाय.  राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, आज मुंबईतील दोन जणांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे सिध्द झाले आहे . यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता १० झाली आहे. दक्षिण आफ्रिकाहून 25 नोव्हेंबर रोजी मुंबईत आलेल्या 37 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली आहे. या व्यक्तीसोबत राहिलेल्या अन् अमेरिकेतून आलेल्या 36 वर्षीय व्यक्तीलाही ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचे प्रयोगशाळा अहवालातून समोर आले आहे.


या दोन्ही रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत , हे दोन्ही रुग्ण सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. या दोन्ही रुग्णांनी फायझर लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.  या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या पाच अतिजोखमीच्या आणि 315 कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरु आहे.


 






विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत त्यांनीही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.


राज्यातील रुग्णाची संख्या दहा - 
शनिवारी डोंबविलीमध्ये ओमायक्रॉनचा एक रुग्ण आढळला होता. त्यानंतर रविवारी पिंपरी चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात एक रुग्ण आढळला. आज मुंबईत दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या दहावर पोहचली आहे. 


एकाच कुटुंबातील सहा रुग्ण –
पिंपरी चिंचवडमधील एकाच कुटुंबातील सहा रुग्णांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. 24 नोव्हेंबर रोजी नायजेरियातून भावाला भेटण्यासाठी आलेल्या 44 वर्षीय महिलेला, तिच्यासोबत आलेल्य दोन मुलींना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्याशिवाय त्या महिलेचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुलींनाही ओमायक्रॉनची लागण झाली आहे. सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून पिंपरी-चिंचवडमधील जिजामाता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या सहा रुग्णापैकी तीन जण 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.


पुण्यातील व्यक्तीला ओमायक्रॉन –
पुण्यातील 47 वर्षीय व्यक्तीलाही ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली आहे. हा व्यक्ती काही दिवसांपूर्वी फिनलँड देशात गेला होता.  29 तारखेला त्या व्यक्ताला ताप आला होता. त्यामुळे त्या व्यक्तीनं कोरोना चाचणी केली. यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळला होता. या व्यक्तीने कोविशिल्ड लस घेतली आहे. या व्यक्तीला कोणतीही लक्षणं नाहीत. प्रकृती स्थिर आहे.