बीड : भ्रष्टाचार निर्मूलन दिनादिवशी भ्रष्टाचार न करण्याची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासातच गेवराईच्या आगारप्रमुखाला 15 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. श्रीनिवास वागदरीकर असे आगारप्रमुखाच नाव असून असून गेवराई आगारात कर्तव्यावर असलेल्या एका लिपिकावर कारवाई न करण्यासाठी 30 हजाराची लाच मागितली होती. त्यातलेच 15 हजार रुपये घेताना वाघदरीकर यांना औरंगाबादच्या लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी बस स्थानकाच्या आवारात एका हॉटेलमध्ये लाचेची रक्कम स्वीकारताना अटक केली आहे.


गेवराईच्या  एसटी आगारात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या  तक्रारदारकडे स्टोअर शाखेचा कारभार आहे. पाच ऑक्टोबर  रोजी विभागीय भांडार अधिकारी व सुरक्षा दक्षता अधिकारी यांनी भांडार शाखेची तपासणी केली होती.  या तपासादरम्यान तपासात काही त्रुटी आढळून आल्या. या संदर्भात तक्रारदाराच्या बाजूने तक्रार अहवाल देण्यासाठी व कोणतीही कारवाई न करण्याच्या बदल्यात आगार प्रमुख श्रीनिवास वागदरीकर यानी कनिष्ठ लिपिकाकडे 25 हजार रुपयांची लाच मागितली होती.  लाचेचा पहिला हप्ता 15 हजार रुपये बसस्थानक परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये घेऊन येण्यास सांगितलं या प्रकरणाची माहिती लाचलुचपत अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये सापळा रचला आणि वागदरीकर याला पंधरा हजार रुपये घेताना रंगेहात पकडल आहे.



 आपल्याकडे लाच मागितल्याची लेखी तक्रार या लीपिकाने  अगोदरच लाचलुचपत विभागाकडे केली होती आणि त्यानुसार औरंगाबादच्या लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून या आगार प्रमुखांना बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून श्रीनिवास वागदरीकर यांचा कर्मचाऱ्यांना त्रास होता असा देखील आरोप कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर केला आहे. तर त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांकडून असे पैसे उकळल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे. आपल्या नोकरीच्या भीतीपोटी कर्मचाऱ्यांच्या मजबुरीचा आगरप्रमुख फायदा घ्यायचे आणि अशाच पद्धतीने त्यांनी अनेक वेळा लाच घेतल्याचही कर्मचारी सांगत आहेत.