नागपूर : "हिरो की असली परख सिर्फ जौहरी को होती है..." मात्र, एखाद्याला जर हिऱ्यांची पारखच नसेल तर मग काय होतं हे नागपुरात लोहमार्ग पोलिसांकडून अटक झालेल्या तीन अर्धज्ञानी चोरट्यांच्या प्रतापामुळं उघडकीस आले आहे. आपण चोरलेले खरे हिरे आहेत हे त्यांना समजलेच नाही. त्यामुळे आंतरराज्यीय टोळीतील तिघांनी तब्बल साडे आठ लाखांचे हिरे फेकून दिले. चोरीतील सोनं मात्र वितळवून लपवून ठेवले तर रोख रक्कम तिघांनी आपसात वाटून घेतली.


नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात असलेले  नयनमुनी मेधी, दिपज्योती मेधी आणि संजू राय या तीन चोरट्यांची गेल्या काही महिन्यात देशभरात विविध ठिकाणी धावत्या रेल्वेत प्रवाशांच्या बॅग, पर्स व इतर किंमती सामान लंपास करण्याचा सपाटाच लावला होता. चोरी करण्याकरता ही टोळी रेल्वेच्या एसी बोगीत रिझर्वेशन करत ऐटीत प्रवास करायची आणि आपले सावज हेरायची.  रात्री प्रवासी गाढ झोपेत असताना त्यांच्या बॅग, पर्स व इतर किंमती सामान चोरून पोबारा करायचे. 10 ऑगस्टला हावडा - मुंबई गीतांजली एक्स्प्रेसमध्ये गोंदीयाजवळ या टोळीनं दोन महिलांचे पर्स चोरले.  श्रीमंत घरातील त्या महिलांच्या एका पर्समध्ये 19 लाख 12 हजारांच्या सोने आणि हिरेजडीत दागिने होते तर दुस-या महिलेच्या  पर्समध्ये 82 हजारांची रोख रक्कम होती. तिघांनी रोख रक्कम व सोने आणि हिरे असलेले दागिने घेऊन आसाममध्ये आपले गाव गाठले. तिथे रोख रक्कम आपसात वाटून घेतली. मात्र सोन्याच्या हिरे जडीत बांगड्या कसे वाटून घ्याव्या असा प्रश्न त्यांना पडला त्यावर उपाय म्हणून ओळखीतल्या एका सोनाराकडे बांगड्या वितळून घेतल्या. सोनार आणि चोरटे दोघे ही नवखे असल्याने त्यांना हिऱ्याची पारख झाली नाही आणि त्यांनी महाग हिरे आधी वितळण्याचा प्रयत्न केला. त्यात यशस्वी झाले नाही म्हणून साडे आठ लाख रुपयांचे हिरे फेकून दिले... 


 पोलिसांनी धावत्या रेल्वेत झालेल्या लाखोंच्या चोरीचा गांभीर्याने तपास सुरू केला. रेल्वे बोगीमधील रिझर्वेशन चार्ट, रिझर्वेशनसाठी वापरलेले आयडी यासह गोंदिया, नागपूर, दुर्गसह अनेक रेल्वे स्थानकाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या आधारावर पोलीस चोरट्यांचा मग काढत आसामपर्यंत पोहोचले. आसाममधील डबोका आणि नोगाव येथून तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 10 लाख 60 हजारांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र, साडे आठ लाख रुपयांचे हिरे त्यांनी फेकून दिल्यामुळे ते जप्त करण्यात पोलिसांना यश आलं नाही. ते हिरे असली आहेत याची कल्पना नसल्यामुळे ते फेकल्याचे चोरट्याने कबुल केले आहे. पोलिसांनी तिघांना अटक करून नागपुरात आणले असून त्यांनी या पूर्वी आणखी कोणकोणत्या धावत्या रेल्वेत चोऱ्या केल्या आहेत याचा तपास सुरू केला आहे.