सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ वनपरिक्षेत्र विभागाने अवैध सागवान लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकसह लाखो रुपये किंमतीचे साग लाकूड जप्त केले आहे. कर्नाटक राज्यातील वाहनामधून सागवान लाकडाची विनापरवाना वाहतूक करताना कुडाळ तालुक्यातील साळगाव मधून बेळगांवकडे वाहतूक होत असताना वनविभागाने ही कारवाई केली आहे. साळगाव येथे संशयास्पद ट्रक अडवून तपासणी केली असता ट्रक मध्ये अवैध सागवान नग 119/ 519 घनफुट माल आढळून आला.
विनापरवाना सागवान लाकूड वाहतुकी प्रकरणी इम्तियाज दस्तगीर मुजावर ( रा. चंदगड जि. कोल्हापूर ) याच्या विरोधात वनोपज लाकूड मालाची विनापरवाना विनापासी अवैध वाहतूक करून भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 (2ब), महाराष्ट्र वन नियमवाली 2014 चे नियम 31, 82 चे उल्लंघन केल्याने वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वाहतूकसाठी वापरण्यात आलेले वाहन व सागवान लाकूड माल जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यांनी लाकूड मालाची विनापासी अवैध वाहतूक करणे भारतीय वन अधिनियम 1927 अन्वये प्रतिबंधित असून अशा अवैध वाहतुकी करिता 2 वर्षे पर्यंतच्या कारावासाची तसेच द्रव्य दंडाचीही तरदूत करणेत आलेली आहे. अवैध लाकूड वाहतुकीवर आळा घालण्यासाठी वनविभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक (प्रा.) सावंतवाडी शहाजी नारनवर व सहाय्यक वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी आय. डी. जालगावकर व वनपरिक्षेत्र अधिकारी, कुडाळ अमृत शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.