अमरावती : तीन वर्षांच्या बालकाला भोंदूबाबाकडून विळ्याने चटके देऊन त्याच्यावर अघोरी पद्धतीने उपचार केल्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील खटकाली गावात घडला आहे. ताप आल्यावर या बालकाला डॉक्टरांकडे नेण्याऐवजी भोंदूबाबाकडे नेऊन अघोरी उपचार करण्यात आले. या प्रकारानंतर बाळाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या संदर्भात अजूनही तक्रार दाखल झालेली नाही. महत्त्वाचं म्हणजे मेळघाटातील आदिवासी भागातील अंधश्रद्धेची ही पाचवी घटना आहे.
मेळघाटातील खटकाली गावात तीन वर्षाच्या बालकाला ताप आला होता. आई-वडिलांनी त्याला धामणगाव गडी इथल्या आरोग्य उपकेंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केलं. मात्र, तिथे त्याला बरं वाटत नसल्याने आई-वडिलांनी त्याला रुग्णालयातून भोंदूबाबाकडे नेलं. यात अंधश्रद्धेतून भोंदूबाबाने या तीन वर्षांच्या बालकाच्या पोटावर गरम विळ्याने चटके दिले. त्याची प्रकृती चिंताजनक असून जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, अशी कितीतरी गप्पा मारल्या तरी मेळघाटसारख्या अनेक भागात आजही अंधश्रद्धा कायम आहे. आदिवासी बांधव डॉक्टरांकडे उपचार न करता भोंदूबाबांकडे उपचार घेण्यासाठी प्राधान्य देतात, हे सातत्याने समोर आलं आहे.
भोंदूबाबावर कारवाई करणार : यशोमती ठाकूर
वारंवार आदिवासी भागात विशेषत: मेळघाटात असे प्रकार घडत आहेत. भोंदूबाबावर नक्कीच कारवाई केली जाईल, असं आश्वासन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलं. त्या पुढे म्हणाल्या की, या भोंदूबाबांवर कारवाई करणं हा उपाय नाही. तिथल्या आदिवासी नागरिकांमध्ये बदल घडवून आणणं गरजेचं आहे. मेळघाटमध्ये सरकारी आणि खासगी सामाजिक संस्था काम करत असूनही अशा घटना घडत आहेत याचं आश्चर्य वाटतं. मी रुग्णालयात जाऊन या बालकाची भेट घेणार आहे."
बालकावर उपचार सुरु : जिल्हा आरोग्य अधिकारी
बालकाच्या पोटावर चटके दिले आहेत, त्याची प्रकृती गंभीर झाल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात आणलं. तिथे योग्य उपचार करुन बालकाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रनमले यांनी दिली.
आई-वडिलांच्या जबाबानंतर कारवाई : पोलीस
या प्रकरणी बालकाच्या आई-वडिलांचा जबाब घेऊन पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती चिखलदरा पोलीस स्थानकाच्या ठाणेदारांनी दिली. तर माहिती घेऊन कळवतो, अशी प्रतिक्रिया ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी यांनी दिली.