कोल्हापूर : पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात फरशी घालून फरार झालेल्या दोन आरोपींना पुन्हा बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीमध्ये हा प्रकार घडला. कोर्टात सादर करण्यासाठी नेलं असताना आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात फरशी घालून पळ काढला होता.


शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये काल (2 मार्च) दुपारी मद्यधुंद अवस्थेत दोन तरुणांनी धिंगाणा घातला होता. यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन आज कोर्टामध्ये सादर करण्यासाठी नेलं. मात्र त्याच वेळी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यामध्ये फरशी घालून हे दोघेजण फरार झाले. एक जण जवळच्याच ऊसाच्या शेतात लपून बसला होता तर दुसरा त्याठिकाणाहून फरार झाला होता. या दोघांनाही पोलिसांनी अवघ्या काही तासात पुन्हा पकडून आणले.



या दोन्ही आरोपींवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना चौकशीसाठी बोलावले असता मद्यधुंद अवस्थेत येऊन त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा घातला. यावेळी त्याने पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. सुमारे अर्धा तास सुरु असलेल्या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.



धक्कादायक म्हणजे विशेष पोलीस महानिरीक्षक यांची पोलीस ठाण्याला भेट होती त्याआधी अवघे काही तास हा सगळा प्रकार घडल्याने कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती.