TET Exam : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीच्या 2019- 20 च्या परीक्षेत तब्बल 7 हजार 800 बोगस अपात्र उमेदवार सापडले. आता 2018 च्या परीक्षेतही 1778 जण अपात्र असतानाही पात्र ठरल्याचे पोलीस चौकशीतून पुढे आले आह. त्यामुळे एकूणच वाढत जाणारा हा आकडा पाहता टीईटी घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढत चालली आहे.
पुणे सायबर पोलिसांनी आतापर्यंत 2019-20 च्या टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार पुढे आणला होता. उमेदवारांकडून पैसे घेऊन परीक्षेच्या निकालामध्ये फेरफार करून काही जण अपात्र असतानाही त्यांना पात्र केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली होती. त्यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जी.ए.टेक्नॉलॉजी कंपनीचे अधिकारी, दलालांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. टीईटीच्या 2019- 20च्या परीक्षेत तब्बल 7 हजार 800 बोगस अपात्र उमेदवार आढळले. यानंतर 2018च्या परीक्षेतही असाच गैरप्रकार झाल्याचा संशय पोलिसांना असल्याने त्या दृष्टीने तपास सुरु केला. त्यानंतर 2018 च्या परीक्षेतही 1778 जण अपात्र असतानाही पात्र ठरल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
दरम्यान, 2018 मध्येही याच प्रकारे गैरप्रकार झाल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्यामध्येही गुन्हा दाखल करुन आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक केली होती. त्यामध्ये आणखी 12 आरोपी निष्पन्न झाले असून पोलिसांकडून त्यांचा तपास सुरु आहे. टीईटीच्या 12 सप्टेंबर 2018 मध्ये झालेल्या परीक्षेच्या मूळ निकालामध्ये 817 जणांचे गुण वाढवण्यात आल्याचे उघड झाले. त्या सर्वांची उत्तरपत्रिका उत्तरसुचीप्रमाणे पडताळणी करण्यात आली. त्यासंबंधीचा मूळ निकाल त्याच दिवशी ऑनलाईन जाहीर झाल्यानंतर संबंधित निकालामध्ये अपात्र असलेले आणखी 710 आणि 38 उमेदवारांचे गुण वाढवून त्यांची माहिती नंतर दोनदा संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये स्पष्ट झाले. त्यानुसार, आत्तापर्यंत 1778 अपात्र उमेदवारांना पात्र केल्याचे आढळून आले आहे.
या आरोपींकडून आतापर्यंत जवळपास साडेतीन कोटी रुपये रोकड, जवळपास एक कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, काही अलिशान गाड्या देखील जप्त करण्यात आले आहेत.या सगळ्या मुद्दे मालाची रक्कम जवळपास साडेसहा कोटी इतकी आहे.