मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांच्या नेतृत्त्वाखाली झालेलं ऐतिहासिक बंड आणि त्यानंतर महाराष्ट्रात झालेलं सत्तांतर या पार्श्वभूमीवर मूळ शिवसेना पक्षाच्या भवितव्याविषयीच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पण सध्या उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackray)  नेतृत्त्वाखालील शिवसैनिकांनी मुंबईतील गिरगावात लावलेलं पोस्टर चर्चेचा विषय ठरतंय. हे पोस्टर आहे उद्धव ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरेंचं (Tejas Thackeray) . आजची शांतता, उद्याचं वादळ... नाव लक्षात ठेवा तेजस उद्धव ठाकरे या आशयाचं पोस्टर लावण्यात आलंय. त्यामुळं ठाकरेंच्या शिवसैनिकांना आता तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील एण्ट्रीची प्रतीक्षा असल्याचं पोस्टरवरुन दिसतंय. 


राज्याच्या राजकारणात आणखी एका ठाकरेंची एन्ट्री होण्याच्या चर्चा सुरू झाली आहेत. 'तेजस ठाकरे यांना राजकीय मैदानात उतरवावे' अशी मागणी युवासेनेनं उद्धव ठाकरेंकडे केली होती.   युवासेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियातही आपली ही इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आजवर जंगलात, दऱ्या खोऱ्यांमध्ये रमणारे तेजस ठाकरे राजकारणाच्या आखाड्यात शड्डू ठोकणार का हे पाहावं लागणार आहे.


ठाकरे आणि पवार या दोन घरांभोवती महाराष्ट्राचे राजकारण गेल्या पाच दशकांपासून केंद्रित आहे. पिढ्यानपिढ्या, राज्याच्या राजकारणाला या कुटुंबांकडून नवे चेहरे मिळत आले आहेत. आता यात एका नवीन नावाची चर्चा होत आहे, ती तेजस ठाकरे यांच्या नावाची. तेजस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा आहे. 7 ऑगस्ट रोजी सामना वृत्तपत्रात त्यांच्या फोटोसह जाहिरातीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आणि तेजस देखील राजकारणात प्रवेश करणार की नाही याविषयी चर्चा सुरू झाली.


तेजस ठाकरे हे रश्मी आणि उद्धव ठाकरे यांचे दुसरे पुत्र आहेत आणि आतापर्यंत ते राजकारणापासून दूर राहिले आहेत. त्याची आवड वन्यजीव छायाचित्रण आणि संशोधनात आहे. खेकड्यांच्या अकरा प्रजाती आणि सापाची एक प्रजाती शोधण्याचे श्रेय तेजसला जाते. तेजसने सामान्यपणे सार्वजनिक कार्यक्रमांपासून स्वतःला दूर ठेवले आहे. भाऊ आदित्य ठाकरे यांच्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्यासाठी आदित्य यांच्यासोबत पहिल्यांदा तेजस दिसले होते. तेजस सहसा माध्यमांच्या कॅमेऱ्यांपासून स्वतःला दूर ठेवतात.


संबंधित बातम्या :


मुंबई ते अलिबाग अंतर अवघ्या 15 मिनिटात! ट्रान्स हार्बर लिंक नोव्हेंबरपासून खुला होणार- काय आहे खासियत