मुंबई : एस.टी. कर्मचाऱ्यांना (ST) शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन भत्ते मिळावेत तसेच थकबाकी मिळावी, यासाठी इंटक ही संघटना आक्रमक झाली आहे आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलाला साकडे घालून मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा इंटकने दिलाय. 1996 पूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त वेतन मिळत होते. परंतु मान्यता प्राप्त कामगार संघटनेने 1996 पासून केलेल्या करारात योग्य वेतनवाढ न झाल्याने कर्मचाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झालंय, असा आरोप इंटकचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केला आहे.
अनियमित वेतनवाढीमुळे कामगारांवर अन्याय
महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेला मान्यता मिळाल्यानंतर झालेल्या वेतन वाढीच्या करारात कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून न देता संघटनेच्या फायद्याचे निर्णय घेऊन आर्थिक शोषण केले आहे. त्यामुळे एस. टी कर्मचाऱ्यांचे वेतन हे शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा अत्यंत कमी आहे. परंतु आमदार गोपिचंद पडळकर यांनी लढा विलीनीकरणाचा नावाखाली कर्मचाऱ्यांच्या भावनांचा राजकारणासाठी वापर करून स्वार्थी राजकारण केले. तसेच एस.टी कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडल्याने नोव्हेंबर 2021 पासून महामंडळातील सेवाविचारात घेऊन त्यांच्यामुळे वेतनात 5000, 4000 आणि 2500 अशी वाढ जाहीर केलेली आहे. त्यामुळे सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात प्रचंड विसंगती निर्माण झाल्या आहेत. अनियमित वेतनवाढीमुळे बहुसंख्य कामगारांवर अन्याय झालेला आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे वेतनातील त्रुटीमुळे आर्थिक शोषण होत आहे, असे मुकेश तिगोटे म्हणाले.
काय आहेत मागण्या?
- करार पद्धत रद्द करून एस.टी कर्मचा-यांना शासकिय कर्मचा-यांप्रमाणे सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी, वेतन निश्चिती
- वेतन व सेवासवलती तात्काळ लागू करण्यात याव्यात.
- एस. टी. कर्मचा-यांना घरभाडे भत्त्याची व वार्षिक वेतनवाढीच्या थकबाकीची रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी.
- महाराष्ट्र शासनाप्रमाणे एस.टी कर्मचाऱ्यांना सुधारित महागाई भत्ता व थकबाकीची रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी.
सध्याच्या परिस्थितीमध्ये 2016 ते 2020 आणि 2020 ते 2024 या कालावधीतील एस. टी. कर्मचाऱ्यांना वेतनवाढीच्या करारात अपेक्षित वाढ होणे अपेक्षित होते. परंतु कामगार संघटनेच्या नाकर्तेपणामुळे वेतनवाढ झालेली नाही. कर्मचाऱ्यांच्या भावनांचा गैरफायदा घेऊन ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी अफवा पसरवून खोटे व भूलथापा मारून कामगारांची फसवणूक केली आहे, असा आरोप इंटकचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केला आहे.
हे ही वाचा :
एसटीला मदत करण्याचे सरकारचे दावे खोटे? निधी अभावी पीएफ, ग्रॅज्युटीचे 800 कोटी थकले असल्याचा आरोप