Monsoon Update in India : मान्सूनच्या (Monsoon) आगमनानंतर दडी मारुन बसलेला पाऊस आजपासून पुन्हा एकदा सक्रीय होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. उत्तर भारतालाही उकाड्यापासून दिलासा मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आजपासून पावसाची रिमझिम सुरु होणार असून 26 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात घट होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.


महाराष्ट्रात आजपासून पावसाची शक्यता


महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकात पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. आज राज्यातील काही भागात पावसाचा (Rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणातील काही भागासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे. 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेत मराठवाड्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


'या' राज्यांमध्ये पावसाची शक्यता


उत्तराखंडमध्ये 26 जूनपर्यंत, हिमाचल प्रदेशात 23 आणि 24 जूनला पाऊस पडू शकतो. 22 आणि 25 जून रोजी पश्चिम बंगाल, 23 ​​आणि 26 जून रोजी ओडिशा, 23 आणि 26 जून रोजी किनारी कर्नाटक, 25 आणि 26 जून रोजी उत्तर अंतर्गत कर्नाटक, 22, 24 आणि 26 जून रोजी नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे पावसाची शक्यता आहे. 


बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्येही पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. सध्या बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेचा फटका बसल्यामुळे अनेाकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर, काहींना जीवही गमवावा लागला आहे.  आता 22 ते 23 जूनपर्यंत बिहारमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.