मुंबई : शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर गुरुवारी मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टानं त्यावर शिक्कामोर्तब केलं. दोन लाखांच्या जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच किंमतीच्या हमीवर न्यायालयानं इंद्राणीची भायखळा जेलमधून सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत.
इंद्राणी मुखर्जीला तिची मुलगी शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी साल 2015 मध्ये अटक केली होती. तेव्हापासून इंद्राणी मुंबईतील भायखळा येथील महिला मध्यवर्ती कारागृहातच आहे. त्यादरम्यान इंद्राणीकडून असंख्यवेळा जामीनासाठी सत्र न्यायालयापासून हायकोर्टापर्यंत अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, न्यायालयानं प्रत्येकवेळी तिचा अर्ज फेटाळून लावला होता. नुकताच इंद्राणीने सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. तेव्हा, खटल्याचे स्वरुप पाहता खटला अनेक वर्ष चालणार आहे. तसेच इंद्राणीने एकदाही पॅरोल घेतला नसून मागील साडेसहा वर्षांपासून कारागृहात आहे. त्यामुळे तिला जामीन मंजूर करत असल्याचे स्पष्ट केलं.
त्या निर्णयानंतर इंद्राणीच्यावतीनं कायद्यानुसार विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. सीबीआय विशेष न्यायालायानं तिची दोन लाखांच्या जात मुचलक्यावर तेवढ्याच किंमतीच्या हमीवर सुटका करण्याचे निर्देश दिले. या अटी पूर्ण करण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला असून जामिनावर सुटल्यावर पुराव्यांशी छेडछाड करू नये आणि जामीनाच्या अटींचे प्रामाणिकपणे पालन करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
गुरुवारची रात्र मात्र कारागृहातच
सर्वोच्च न्यायालयानंतर विशेष न्यायालयानेही इंद्राणीला जामीन दिला असला तरीही कायदेशीर कागदपत्रांची पुर्तता न झाल्यामुळे इंद्राणीला गुरुवारची रात्रही कारागृहातच काढावी लागली. शुक्रवारी सकाळी कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर इंद्राणीची दुपारच्या दरम्यान जेलमधून सुटका होण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणीचा चालक शामवर राय याला बेकायदेशीर हत्या बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर केलेल्या चौकशी दरम्यान या हत्याकांडाचा साल 2015 मध्ये उलगडा झाला. इंद्राणीने आपला पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांच्यासोबत मिळून आपल्या पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली आणि 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची पनवेलनजीक विल्हेवाट लावल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी इंद्राणीचा पती पीटर मुखर्जी यालाही या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक झाली होती.