अमरावती : पती-पत्नीमध्ये घटस्फोट झाल्यानंतर तब्बल 20 वर्षांनंतर त्यांचा पुनर्विवाह थाटात पार पडला. अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुऱ्हा देवी गावातील या विवाहाची सर्वत्र जिल्ह्यात चर्चा होत आहे..
अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुऱ्हा देवी येथील सुगंधा मोरे हिचा अकोलाच्या मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपूरी येथील संतोष जामणिक यांच्याशी 20 वर्षाआधी लग्न झालं होतं. 7 वर्ष हा संसार सुरळीत चालला परंतु पती संतोष जामणिक याला दारूचे व्यसन जडल्याने दोघांमध्ये वाद व्हायचे. शेवटी पत्नी सुगंधा पतीला सोडून माहेरी आली. सुगंधाचे आई-वडिलांनी दोन वर्षांनंतर मूर्तिजापूर तालुक्यातील बोरटा या गावी सुगंधा हिचं दुसरं लग्न लावून दिलं. पण दुसऱ्या ही पतीला दारूचे व्यसन होते आणि नशेत मारहाण करत असल्याने तिथेही दोघांमध्ये पटले नाही. पत्नी सुगंधा परत मुऱ्हा देवी येथे आपल्या माहेरी आली. तेव्हाच सुगंधा यांनी ठरवलं की, आता लग्न करायचं नाही मोल-मजुरी करून आपण आपलं जगायचं आई-वडिलांना ओझं व्हायचं नाही.
सुगंधा ही आई-वडिलांच्या घरी स्वतः शेतीचे काम करून उपजीविका भागवत होती. मागील आठवड्यात सुगंधाचा पहिला पती संतोष जामणिक हा 20 वर्षांनंतर परतला. संतोष जामणिक हा सुगंधाच्या आई-वडिलांकडे आला आणि पुनर्विवाह करण्याची इच्छा बोलून दाखविली सोबतच मला माफ करा यानंतर मी कधीही मद्यपान करणार नाही, असे त्याने वचन दिले. त्यामुळे सुगंधासह तिच्या कुटुंबाने या पुनर्विवाहाला होकार दिला आणि अखेर 20 वर्षानंतर शनिवारी 18 सप्टेंबरला सायंकाळी हा विवाह मुऱ्हा देवी येथे थाटात पार पडला.
दारू सोडली म्हणून मी लग्नास होकार दिला : सुगंधा
20 वर्षाआधी माझं लग्न संतोष जामणिक यांच्यासोबत झालं. पण दारूमुळे ते नेहमी घरात वाद-विवाद व्हायचे. अखेर मी कंटाळून परत माझ्या माहेरी आली. तेव्हा दोन वर्ष उलटल्यानंतर आई-वडिलांनी मला दुसरं लग्न करण्यासाठी सांगितलं तेव्हा मी त्यांचं मान ठेवून पुन्हा दुसरं लग्न केलं. पण तिथेही माझ्या नवऱ्याला दारूचं व्यसन होतं. नेहमी मला त्रास होत असल्याने अखेर मी परत माहेरी आली आणि ठरवलं की आता लग्न करायचं नाही. पण मागील आठवड्यात माझे पहिले पती संतोष जामणिक घरी आले आणि आई-वडिलांची माफी मागितली आणि यानंतर मी कधीच दारू पिणार नाही. आणि मी माझी शेती विकून इथंच तुमच्या गावात राहणार फक्त माझा सुगंधाशी लग्न लावून द्या अशी विनंती केली. तेव्हा मी ही होकार दिला आणि शनिवारी आमचं पुनर्विवाह झाला. मी सध्या आनंदीत आहे. आणि आम्ही दोघेही आता नवीन संसाराला सुरुवात केली आहे. अशी प्रतिक्रिया सुगंधा यांनी एबीपी माझाला दिली.
दारूमुळे माझं आयुष्याचा सत्यानाश झाला : संतोष जामणिक
माझं लग्न 20 वर्षाआधी सुगंधा हिच्याशी झालं पण दारूमुळे माझं आयुष्याच्या सत्यानाश झाला. माझ्या व्यसनामुळे माझी पत्नी मला सोडून गेली. ती सोडून गेल्यावर मी शेती आणि सेंट्रींगचं काम केलं पण मी दुसऱ्या लग्नाचं विचारही केला नाही. मग मला जेव्हा समजलं की सुगंधाच दुसरं लग्न मोडलं तेव्हा मी मागील आठवड्यात मुऱ्हा देवी इथं आलो आणि सुगंधाच्या आई-वडिलांची माफी मागितली आणि माझी लक्ष्मी मला परत करा असं बोललो आणि यानंतर मी कधीही दारू पिणार नाही असं वचन दिलं. तेव्हा त्यांनी लग्नास होकार दिला आणि सुगंधाने पण. आता मी माझी दीड एकर शेती आणि माझं घर विकून मी मुऱ्हा देवी यागावीच राहणार असं संतोष जामणिक यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली...