Pune Vaikunth Crematorium : पुण्यातील रस्त्यांवरील (Vaikunth Crematorium)  ट्रॅफिकमुळे पुणेकर त्रस्त आहेतच मात्र हा हेच ट्रॅफिक स्मशानभूमीपर्यंत पोहचल्याचं चित्र आहे. जीवंतपणी रत्यावर ट्रॅफिक जाम आणि मरणानंतर वैकुंठातदेखील ट्रॅफिक जाम अशी सध्या पुणेकरांची परिस्थिती झाली आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यातील नवी पेठेतील वैकुंठात तीन तास लोकांना थांबावं लागत आहे. त्यामुळे मृत व्यक्तींचे नातेवाईक चांगलेच संतापले आहेत. 


पुण्यातील नवी पेठेतील वैकुंठात मागील काही दिवसांपासून प्रेतांची रांग बघायला मिळत आहे. वैकुंठात असलेल्या गैरसोयीमुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वैकुंठ येथे तीन विद्युतदाहिनी  आणि एक गॅसदाहिनी आहे. त्यातील दोन दाहिनी बंद आहेत. त्यामुळे मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी वेळ लागत आहे. एका मृत व्यक्तीला अग्नी दिल्यावर ती दाहिनी थंड होण्यासाठी किमान तीन तास लागतात. त्यामुळे दुसऱ्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा खोळंबा होत आहे.


प्रेतांच्या रांगाच-रांगा


विद्युतदाहिनी बंद असल्यामुळे अनेक नातेवाईकांचा खोळंबा होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे वैकुंठात प्रेतांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. एका मृत व्यक्तीसोबत त्यांच्या सामाजिक वावरानुसार 12 ते 60 व्यक्ती येतात. त्यामुळे वैकुंठात एक प्रेत अंत्यसंस्कारासाठी आलं तरीही गर्दी होते. त्यात जर रोज किमान चार ते पाच अंत्यसंस्कार पार पडणार तर वैकुंठात मोठी गर्दी होते. त्यामुळे वैकुंठातील सुविधेबाबत अनेक मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.


वैकुंठातील स्वच्छतागृहे आणि स्नान सुविधेबाबत सातत्याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या जात होत्या. स्वच्छतागृहांच्या सुशोभीकरणासह स्नानसुविधेमध्येही बदल करण्यात येणार आहेत, असं सांगितलं मात्र ते झालं नसल्याचं समोर आलं आहे. विद्युतदाहिनीजवळील मोकळ्या जागेतच दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे पार्किंग होत असल्याने त्यासाठी वेगळ्या व्यवस्थेसंदर्भात अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहे. 


उन्हात नातेवाईकांचे हाल...


पुण्यात मागील काही दिवसांपासून वातावरणातदेखील बदल झाला आहे. सकाळी गारठा तर दुपारी कडाक्याचं ऊन जाणवत आहे. त्यामुळे मृत व्यक्तींसोबत आलेल्या नातेवाईकांचे उन्हात हाल होत आहेत. वैकुंठात पाण्याची सोय नाही आहे. शिवाय काही वर्षांपूर्वी लहान कॅन्टिन होतं. मात्र गोळीबार झाल्यानंतर कॅन्टिन बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे वैकुंठात योग्य सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी परिवर्तन संस्थेच्या डॉ. शैलेश गुजर यांनी केली आहे.