Chhatrapati Sambhajinagar: आधीच अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडला असताना, पिकांना योग्य भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीला कंटाळून शेतकरी आत्महत्यासारखं (Farmer Suicide) टोकाचे पाऊल उचलत आहे. दरम्यान डोक्यावरील कर्ज तसेच नापिकीमुळे हैराण झालेल्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या सिल्लोड मतदारसंघातील दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊ आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सिल्लोडच्या अंधारी गावात ही घटना उघडकीस आली असून, एकापाठोपाठ एक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भागिनाथ बाळूबा पांडव (वय 46 वर्षे), जनार्दन सुपडू तायडे (वय 55 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावं आहेत.
आधी अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातून गेले. त्यानंतर आता शेतात लावलेले टरबुजाचे म्हणावे तसे उत्पन्न झाले नाही. त्यातच डोक्यावर असलेल्या कर्जाचा डोंगर या निराशेपोटी या शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच गावातील आणि एकापाठोपाठ एक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
एकापाठोपाठ एक शेतकऱ्यांनी केली आत्महत्या
भागिनाथ पांडव यांच्याकडे तीन एकर शेती आहेत. त्यात त्यांनी टरबुजाची लागवड केली होती. मात्र, अपेक्षित उत्पादन झाले नाही. यामुळे कर्ज फेडायचे कसे, यामुळे ते तणावात होते. त्यांनी शुक्रवारी शेतातील घरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान शनिवारी जनार्दन तायडे यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सदरील घटना रविवारी सकाळी निदर्शनास आली. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार ते ठोक्याने जमीन कसायचे. यात त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्यामुळे ते सतत चिंतेत होते. यातून त्यांनी हे पाऊल उचलले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. मृत शेतकऱ्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघातील घटना
राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, त्यांना पूर्णपणे मदत करत असल्याचा दावा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून सतत केला जात आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सरकार स्थापन होताच राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यात येणार असल्याचा दावा केला होता. पण असे असताना राज्यातील शेतकरी आत्महत्या काही थांबत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातच एकापाठोपाठ दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या करत गळफास घेतला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Unseasonal Rain: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाला सुरुवात, पुढील चार दिवस अवकाळीची शक्यता