Pune pmc Budget Details :  पुणे महानगरपालिकेचा वर्ष 2023-24 या वर्षाचा (pmc) अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी हा अर्थसंकल्प जाहीर केला. एकूण 9515 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प घोषित केला. यामध्ये पुणे शहरातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यात शहरात पूल बांधण्यापासून तर शहरात डॉग पार्क बांधण्यापर्यंत वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या. महत्वाचं म्हणजे पुण्यातील मागील अनेक महिन्यांपासून ऐरणीवर असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाय सुचवले आहेत. 2022-23 या वर्षापेक्षा 2023-24 या वर्षातील अर्थसंकल्पात 923 कोटींची भर घालण्यात आली आहे. 


अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या घोषणा?


- यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद पाणी पुरवठ्यासाठी करण्यात आली आहे.


- पाणी पुरवठ्यासाठी 1321 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


- शहरातील मलनिसरणासाठी 812 कोटी रुपये तर घनकचरा व्यवस्थापनसाठी 846 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.


- वाहतूक नियोजन आणि प्रकल्पासाठी 590 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


- पुण्यातील रस्त्यासाठी 992कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


- पी एम पी एल साठी 459 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


- पुणे शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी 468 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


- आरोग्यासाठी 505 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


- नियमित मिळकत कर भरणाऱ्याना पुणे महानगर पालिका बक्षीस जाहीर करणार आहेत. 


- श्वान प्रेमींसाठी पुण्यात डॉग पार्क उभारण्यात येणार आहे.


- शहरात फेरीवाले यांच्यासाठी देखील hawkers प्लाझा/  hawkers पार्क उभी करण्यात येणार आहे.


- पाणीपट्टी दरांमध्ये कुठलीच वाढ करण्यात आली नाही.


- वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुण्यात 8 नवीन उड्डाणपूल उभारणार असल्याची महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. 


- नव्याने समाविष्ट 23 गावांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.


- पगार आणि पेन्शनवर सुमारे 3100 कोटी खर्च होणार आहे.


पुण्यात होणारे काही महत्त्वाचे प्रकल्प:


- पुण्यात कचऱ्यापासून हायड्रोजन प्रकल्प उभारणार


- वारजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल


- सिंहगड रोड उड्डाणपूल, नदी पुनर्जीवन प्रकल्प होणार


- डॉग पार्क, हायड्रो ऊर्जा प्रकल्प, चार्जिंग स्टेशन उभारणे आदींचा समावेश


वाहतूक कोंडी सुटणार?


वाहतूक कोंडी ही पुणेकरांची सगळ्यात महत्वाची समस्या आहे. या समस्येवर महापालिकेने तोडगा काढला आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात वाहतूक नियोजन आणि प्रकल्पासाठी 590 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुण्यात 8 नवीन उड्डाणपूल उभारणार असल्याची महत्वाची घोषणा करण्यात आली आहे.