Parbhani News: मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असताना, पीक विमा कंपन्याचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना योग्य वागणूक देत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. दरम्यान कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना काही शेतकऱ्यांनी याबाबत त्यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावर सत्तार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत विमा कंपनी प्रतिनिधी, महसूल विभागाचे अधिकारी आणि तालुका कृषि अधिकारी यांनी समन्वय ठेवत शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने सोडविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पीक विमा कंपन्याचे प्रत्येक तालुकास्तरावरील कार्यालये तात्काळ सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 


कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दौऱ्यादरम्यान जिंतूर तालुक्यात पीक विमा कार्यालय बंद असल्याचे निदर्शनास आले होते. त्याचबरोबर जिल्हाभरात पीक विमा कंपनीची सर्व कार्यालये बंद असल्याचे शेतकऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. पिकविमा कंपनीचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित नसणे, शेतकऱ्यांचा समक्ष व भ्रमणध्वनीवरून संबंधित कर्मचाऱ्याचा फोनवर संपर्क न होणे, तसेच प्रत्यक्ष भेटी न घेणे, शेतक-यांच्या विमाविषयक तक्रारीचा तातडीने निपटारा न करणे अशा स्वरुपाच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या.  त्याबाबत मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत बैठकीला उपस्थित असलेल्या जिल्हा प्रतिनिधीला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते.


सत्तार यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने पिक विमासंबंधित कंपनीचे अधिकारी-कर्मचारी यांच्याशी संपर्क करून तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पिक विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नायब तहसीलदार यांचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत. त्यामुळे याचा फायदा आता शेतकऱ्यांना होणार आहे. तर पीक संबधित तक्रारी आता तालुकास्तरावर मांडता येणार आहे. 


परभणी जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर नुकसान...


परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. कापूस,सोयाबीनसह सर्वच खरीप पीकांचं नुकसान झाले आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर या दोन महिन्यात परभणी जिल्ह्यात 4 लाख 61 हजार 407 शेतकऱ्यांचे 2 लाख 19 हजार 105 हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. यासाठी 279 कोटी 98 लाख रुपयांची मदत अपेक्षित आहे. विशेष म्हणजे अजूनही अनेक भागात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.