Kailas Patil Agitation : शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा 2020 चा पीक विमा (Pik Vima) मिळावा तसेच अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचे अनुदान मिळावं या मागणीसाठी गेल्या सहा दिवसापासून ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील (Mla Kailas Patil) उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. दरम्यान, यासंदर्भात रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कैलास पाटील यांच्याशी संवाद साधला आहे. याबाबत विमा कंपनीशी बैठक घेऊ, तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचे पैसे लवकरात लवकर देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती कैलास पाटील यांनी दिली. मात्र, जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, त्यांना पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.


प्रशासकीय कारवाईत दिरंगाई, पैसे मिळाल्यानंतर उपोषण मागे घेणार


माझ्या उपोषणामुळं जर शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळणार असतील तर मी हे उपोषण सुरुच ठेवणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पैसे मिळाल्यानंतरच मी उपोषण थांबवेल असेही पाटील यांन सांगितलं. काल एका दिवसात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचेही पाटील यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. त्यांच्या विश्वास नाही असे नाही पण प्रशासकीय कारवाईत दिरंगाई होत आहे. कारण 13 ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांकडून गेलेला प्रस्ताव काल विभागीय आयुक्तांनी पाठवला आहे. कामात अशा प्रकारची दिरंगाई होत आहे. माझ्यामुळं जर  शेतकऱ्यांना एक दोन दिवस लवकर पैसे मिळणार असतील तर उपोषण सुरुच ठेवणार असल्याचं कैलास पाटील यांनी सांगितलं.


कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका, कैलास पाटलांची शेतकऱ्यांनी विनंती


सर्व शेतकऱ्यांचे विमा कंपनी व सरकारकडून हक्काचे 1 हजार 200 कोटी रुपये येणे बाकी आहे. दसरा गेला, दिवाळीही गेली. पण सरकारला पाझर फुटला नाही. म्हणून मी आपल्या बळीराजाचा हक्क मिळवून घेण्यासाठी सहा दिवसापासून उपोषण करीत आहे. काही मागण्यांवर गतीने काम सुरू झाले आहे. परंतु प्रत्यक्षात हाती काहीच नसल्याचे कैलास पाटील म्हणाले. जूनपासून आतापर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात 42 शेतकरी बांधवांनी मदतीची वाट बघत आपला जीव दिला आहे. त्यांच्या कुटुंबावर काय दुःख बेतलेले असेल, त्यांच्या जाण्याने किती वेदना त्यांच्या कुटुंबाला झाल्या असतील, याची जाण मला निश्चितच आहे. त्यांच्या या वेदनेपुढे माझी शारीरिक वेदना काहीच नाहीत. मानसिक वेदना मांडण्यासाठी मात्र माझ्याकडे आज शब्द नाहीत असे पाटील म्हणाले. हा लढा आता तुमच्या सर्वांचा आहे. तुम्ही सर्वांनी जे प्रेम दिले, तीच माझी ऊर्जा ठरत आहे. असेच प्रेम कायम असू द्या. आपण लढू, हक्क मिळवू, फक्त कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका, ही माझी शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती असल्याचे पाटील म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Kailas Patil Agitation : आमदार कैलास पाटलांच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांनी टाकल्या पाण्यात उड्या, आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस