मुंबई : पहाटेच्या शपथविधीवरून राज ठाकरेंनी अजित पवारांना काल टोला दिला. लग्न कोणासोबत केलं.. पळून कोणासोबत गेले म्हणत शपथविधीची आठवण केली. त्यावर आज अजित पवारांनी आज राज ठाकरेंचा समाचार घेतला. राज ठाकरे सध्या सरड्यासारखे रंग बदलत असल्याची टीका अजित पवारांनी केली आहे.
राज ठाकरेंना नकलेशिवाय काही जमत नाही
अजित पवार म्हणाले, राज ठाकरेंना नकलेशिवाय आणि टीकेशिवाय काही जमत नाही. त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण करावं की एकेकाळी निवडून आलेले 14 आमदार आपल्याला सोडून का गेले. फक्त भाषण करुन जनतेचे प्रश्न किंवा रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही.
राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात
राज ठाकरे सतत पलटी मारतात. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी आताच्या केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर विधानसभाचे काळात सुद्धा त्यांनी काय केलं हे आपण पाहिलं आणि आता कालच्या सभेत काय केलं तेही पाहिलं. त्यामुळे राज ठाकरेंचं सरड्यासारखे रंग बदलण्याचं काम चाललं अहे, अशी टीका अजित पवारांनी केली.
पवार आता जातीयवादी वाटायला लागले
शिवाजी पार्कवरच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालत महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं. शरद पवारांवरही राज ठाकरेंनी टीका केली. शरद पवारांना जातीपातीचं राजकारण हवं असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला. यावर अजित पवार म्हणाले, एकेकाळी पवारांचं कौतुक केलं आता त्यांना ते जातीयवादी वाटायला लागले. एकेकाळी पवार साहेब यांची मुलाखत घेतली होती त्यावेळी कौतुक केलं. अन् आता टीका करतात. मुलाखत घेतली त्यावेळेस पवार जातीवादी वाटले नाहीत आताच त्यांना जातीवादी वाटायला लागले. पवार साहेब आताच राजकारणात नाहीत. यांचा जन्म नव्हता तेव्हा साहेब राजकारण करायला लागले आणि त्यामुळे अशा लोकांनी टीका टिप्पणी करणं म्हणजे सूर्याकडे बघून थुंकण्यासारखं आहे.
संबंधित बातम्या :