Raj Thackeray : राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं. शरद पवारांवर जातीयवादी राजकाराणाचा आरोप केला. राज ठाकरेंच्या भाषणानंतर भाजपसह विरोधकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. विरोधकांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ईडीच्या चौकशीच्या भीतीनं राज ठाकरे यांनी रिव्हर्स गियर घेतल्याची टीक जयंत पाटील यांनी केली. त्याशिवाय जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांनीही राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. तर भाजपने राज ठाकरेंच्या भाषणाचं समर्थनं केलेय. पाहूयात कोण काय म्हणाले? 


चौकशीच्या भीतीनं राज ठाकरेंचा रिव्हर्स गियर- जयंत पाटील
चौकशीच्या भीतीनं राज ठाकरेंचा रिव्हर्स गियर टाकल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी दिली. यूपीला न जाताच राज ठाकरेंकडून कौतुक करण्यात आले. लाव रे तो व्हिडीओ कुठं गेलं?, असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला. 


'राज ठाकरेंचं कधी लाव रे, कधी धाव रे'-जितेंद्र आव्हाड
शिवरायांच्या महाराष्टात गाडलेल्या जेम्स लेन ला परत वरती काढायची गरज नाव्हती. जेम्स लेन चे जन्मदाते हे कोण होते हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. जे गेले त्यांच्या बद्दल बोलणे आमच्या संस्कृतीत नाही. महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट ते मशिदीबाहेर भोंगे घेऊन पोरांना बसायला सांगणे, हा प्रवास आहे राज ठाकरे यांचा, अशी टीकाही त्यांनी केली. 



राज ठाकरेजी हिंदू महासभा आणि जनसंघाला ठेवायचं झाकून आणि राष्ट्रवादीला बगायचं वाकून हे योग्य नाही.... सचिन खरात
गेले पाच हजार वर्ष एक जात सर्व जातींना आपल्या हातातलं खेळणं समजून आपणच उच्च जातीचे आहोत धार्मिक, सांस्कृतिक सत्ता गाजवत होते त्यानंतर हिंदू महासभा आणि जनसंघाचा उदय झाल्यावर जातीपातीचे राजकारण खेळू लागले म्हणून तर जनसंघाला भटजीचा पक्ष म्हणतात त्यामुळे आदरणीय शरद पवार साहेब यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर जातीपातीचे राजकारण सुरु झाले म्हणणे म्हणजे हिंदू महासभा आणि जनसंघाला ठेवायचं झाकून आणि राष्ट्रवादीला बगायचं वाकून हे होय. अभ्यास थोडा कच्चा वाटतोय त्यामुळे अभ्यास अभ्यास करून भाषण करा ही विनंती.


अमोल मिटकरीची टीका -
लॉकडाउन आणि कोरोणामुळे विस्मृतीत गेलेले अभ्यासपूर्ण भाषण #आधारवड (काही आठवते का बघा), असे म्हणत अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचा जुना व्हिडीओही पोस्ट केलाय. 


राज ठाकरेंचं म्हणणं खरं - फडणवीस
राज ठाकरेंचं म्हणणं खरं आहे. पहिल्या क्रमांकाचा पक्ष बाहेर बसला आहे. बाहेर ठेवण्यासाठी तीन पक्ष एकत्र आले आहेत. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.  


काय म्हणाले राज ठाकरे?
शिवाजी पार्कवरच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालत महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं. राज ठाकरेंच्या टार्गेटवर होते अर्थातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार.
राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालताना मशिदीवरचे भोंगे उतरवावेच लागतील असा इशारा दिला. ज्या मशिदीवरचे भोंगे उतरवले जाणार नाहीत, त्याच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचा इशाराही राज ठाकरेंनी दिलाय. मुंबई महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केलाय. मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांची संपत्ती ईडीकडून जप्त होत असल्यानंच मुख्यंमत्र्यांना जाग आल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय. शरद पवारांवरही राज ठाकरेंनी टीका केलीय. शरद पवारांना जातीपातीचं राजकारण हवं असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केलाय..