मुंबई : केंद्र सरकारच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजीकडून (सीआयईटी) दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शिक्षकांसाठीचे राष्ट्रीय पातळीवरील आयसीटी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सन 2018 आणि 2019 या दोन वर्षांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील सहा शिक्षकांचा राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार मिळाला आहे. नागनाथ विभुते, आनंद अनेमवाड, उमेश खोसे यांची 2018 साठीच्या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. तर मृणाल गांजळे, प्रकाश चव्हाण, शफी शेख यांना 2019 चा आयसीटी पुरस्कार मिळाला आहे


विद्यार्थ्यांच्या शिकण्यात आणि शिक्षकांकडून शिकवण्यात नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना शिक्षण देताना तंत्रज्ञानाची जोड देऊन शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या देशभरातील निवडक मोजक्या शिक्षकांना हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षी देशभरतील 205 शिक्षकांचे अर्ज निवडले गेले होते. त्यात सर्व शिक्षकांचे प्रेझेन्टेशन फेब्रुवारी महिन्यात झाल्यानंतर त्यातील 2018 आणि 2019 वर्षासाठी 49 शिक्षकांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील शिक्षकांनी आणि त्यात सुद्धा ग्रामीण भागात शिकवणाऱ्या शिक्षकांनी आपल्या कामाने आणि नावीन्यपूर्ण प्रयोग आणि कौशल्य दाखवून हे यश संपादन केले आहे.


याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सुद्धा या सर्व शिक्षकांचा ट्विट करून अभिनंदन केले आहे. 


माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा(ICT)चा वापर करुन शिकवण्याच्या व शिकण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्यात महाराष्ट्रातील शिक्षक अग्रेसर आहेत. हीच परंपरा कायम ठेवत जिल्हा परिषद शाळांतील आमच्या सहा प्रतिभावान शिक्षकांना देशपातळीवरील प्रतिष्ठित राष्ट्रीय आयसीटी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. दर्जेदार शिक्षणात तंत्रज्ञानाचा वाटा मोठा असून तो मार्ग दाखवण्याचे काम आपले जिल्हा परिषदेचे शिक्षक करीत आहेत असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.


 






महत्वाच्या बातम्या :