सातारा : कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केला. हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या निकटवर्तीयांचा आहे. त्यामुळे ईडीची कारवाई ही थेट अजित पवारांना धक्का असल्याचं समजलं जात आहे. ईडीने 65 कोटी 75 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.


महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित 25 हजार कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याचसंदर्भात ईडीने ही कारवाई केली आहे. पीएमएलए कायद्यान्वये कारखान्याची जागा, इमारत, कारखाना आणि मशिनरी जप्त करण्यात आली.


राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हाही दाखल केला होता. 2019 मध्ये नोंद एफआयआरच्या आधारावर हा पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. हा साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय राजेंद्र घाडगे यांच्या ताब्यात होता.






साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना थकीत कर्जामुळे लिलावात काढण्यात आला होता. 2010 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने या कारखान्याचा लिलाव करुन गुरु कमॉडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला विकला होता. हा व्यवहार बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दरामध्ये झाला असून त्यासाठी घेतलेल्या लिलाव प्रक्रियेमध्ये नियमांचं पालन न केल्याचा आरोप ईडीने केला आहे.


ईडीच्या दाव्यानुसार, गुरु कमॉडिटीजने हा कारखाना जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडला भाडेतत्त्वावर दिला. स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेडकडे या कारखान्याचे सर्वांत जास्त शेअर्स आहेत. तपासामध्ये स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचं आढळून आलं आहे, असं ईडीने आपल्या प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे.


थकीत कर्जामुळे कारखान्याचा लिलाव झाल्याचं म्हटलं जात आहे. परंतु या प्रकरणात गैरव्यवहार झाला असून अजित पवार यांनी आपल्याकडून हा कारखाना बळकावल्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला होता. माजी आमदार आणि माजी महलूसलमंत्री शालिनीताई पाटील या कारखान्याच्या संस्थापक आणि चेअरमन होत्या.