Nashik News : काही दिवसांपासून धरणात (Dam), नदीच्या पाण्यात बुडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून नाशिक (Nashik) जिल्ह्यात मागील काही दिवसांत अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच नाशिकरोड परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. आंघोळीसाठी गेलेल्या चार मित्रांपैकी दोघांचा बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एकाच परिसरातील दोन मुले बुडाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


काही दिवसांपूर्वी इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील गोंदे दुमाला येथील दारणा नदीत बुडून लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आईसोबत कपडे धुण्यासाठी गेला असता ही घटना घडली होती. यावेळी आईने 'माझ्या मुलाला वाचवा हो... माझा मुलगा पाण्यात बुडतोय, कोणीतरी वाचवा माझ्या दादाला, अशी आर्त हाक दिली होती. मात्र कुणीही मातेच्या मुलाला वाचवू शकले नाही. अशातच नाशिकरोड येथील मित्रांचा ग्रुप सिन्नर फाटा (Sinnar Fata) परिसरात आंघोळीसाठी गेला असता चेहेडी बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला आहे. 


चेहेडी येथील (Chehedi) दारणा नदीवरील महापालिकेच्या (Nashik NMC) चेहेडी बंधाऱ्यात दोन जण बुडाल्याची घटना घडली आहे. सिन्नरफाटा भागातील दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने ते बुडाले असून अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होते. चेहेडी येथील दारणा नदीला आवर्तन सुरु असून नाशिक महापालिकेच्या चेहेडी बंधाऱ्याचे काही गेट उघडण्यात आले आहे. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास सिद्धार्थ संकेत गांगुर्डे, राहुल दीपक महानुभाव, संतोष नामदेव मुकणे आणि आर्यन नंदू जगताप हे चार युवक आंघोळीसाठी गेले होते. त्यातील दोघांनी बंधाऱ्यावरुन पाण्याच्या प्रवाहात पूर्वेच्या दिशेला पाण्यात उडी मारली. याचवेळी सिद्धार्थ गांगुर्डे आणि राहुल महानुभाव हे दोघे पाण्याच्या उलट्या प्रवाहात सापडल्याने त्यांना बाहेर निघणे मुश्किल झाले. अशावेळी त्यांनी मदतीसाठी धावा केला. 


पोहणे बेतले जीवावर 


मात्र काठावरील दोन्ही मित्रांची भंबेरी उडाल्याने त्यांनी घर गाठत घडलेला प्रकार सांगितला. तातडीने नजीकच्या अग्निशमन दलाला याबाबत कळवण्यात आल्यानंतर पथक पोहोचले. त्यानंतर रात्री उशिरापर्यत शोधमोहीम सुरु होती. मात्र दोघांचेही मृतदेह अद्याप आढळून आलेले नाहीत. मात्र या दोघांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. एकीकडे पोहण्याचा मोह तरुणांचा जीवावर बेतला आहे. सद्यस्थितीत ऊन वाढत असल्याने तरुण वर्ग दुपारच्या सुमारास विहिरी, धरणे, तलाव आदी ठिकाणी आंघोळीसाठी जात असल्याचे निदर्शनास येत आहे. याच दरम्यान अनुचित प्रकार घडत आहेत.