Maharashtra Rain : सध्या केरळमध्ये मान्सून (Monsoon) दाखल झाला आहे. पुढच्या 48 तासात मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण त्यापूर्वीच राज्यातील काही भागात मान्सून पूर्व पावसानं वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. राज्यातील हिंगोली, नंदूरबार, नाशिक, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. 


नाशिक


नाशिकच्या सटाणा तालुक्यातील ब्राम्हणगाव, शेमळी परिसरातील गावांना काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसाने  शेतात पाणी साचले होते. तर सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे परिसरातील  झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले. रस्त्यावर झाडे पडल्याने मालेगाव-सटाणा रोडवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. उशीरापर्यंत रस्त्यावरील उन्मळून पडलेले झाडे जेसीबीच्या सहाय्याने बाजूला काढण्याचे काम सुरू होते. तर अनेक गावातील विज पुरवठाही खंडित झाला होता.


सिंधुदुर्ग


सिंधुदुर्गच्या कुडाळमधील सह्याद्रीच्या पट्ट्यात अवकाळी पाऊस पडला आहे. माणगाव खोऱ्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र मान्सूनची प्रतीक्षा बळीराजा चातकाप्रमाणे करत आहे. पाऊस लांबल्याने शेतीची कामे लांबणीवर गेली. त्यामुळं बळीराजा पावसाची प्रतिक्षा करत आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे.


नंदूरबार जिल्ह्यात पावसाची हजेरी


नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात मान्सून पूर्व पावसानं वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. खोकसा नदीला मान्सूनपूर्व पावसाने आला पूर आला आहे. या पावसामुळं फळबागांचे नुकसान झाले आहे. झाडांची पडझडही झाली आहे. विद्युत तारा पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. पानबारा गावात दोन डोंगरांवरून विहंगम इंद्रधनुष्याचे दृश्य ग्रामस्थांना बघायास मिळाले. नवापूर तालुक्यात सर्वत्र पंधरा-वीस मिनिटांची पावसाची हजेरीने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. 


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरकर उकाड्याने पुरते हैराण झाले होते. मात्र पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून, त्यामुळे संभाजीनगरकर सुखावले आहेत. पावसाने शहरात आणि ग्रामीण भागात देखील हेजरी लाभली आहे. विशेष म्हणजे या वर्षातील हा पहिला पाऊस असून,पहिलाच पाऊस जोरदार झाल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केला जात आहे. दरम्यान जोरदार वाऱ्यामुळे शहरातील वेदांत नगर भागात एक झाड रिक्षांवर उन्हाळून पडलं, यात एक जण जखमी झाला आहे. तर शहरातील काही भागात पाणी साचल्याने जेसीबीने पाणी काढण्यात आले.


हिंगोली जिल्ह्यातही वादळी पाऊस


हिंगोली जिल्ह्यातील टेंभुर्णी हापसापुर शिवारात आज सायंकाळच्या सुमारास आचानक मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. 
वादळी वारे मोठ्या प्रमाणावर आल्याने घरावरील पत्रे उडाले. तसेच घरातील संसार उपयोगी सर्व साहित्यांची नासधूस झाली आहे. घरातील डाळी अन्नधान्य आणि पेरणीसाठी आणलेल्या बी बियाण्याचे सुध्धा मोठ्या  प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या वादळी वारे आणि पावसामुळे नागरिक चांगलेच गोंधळून गेले होते. वारे इतक्या मोठ्या प्रमाणावर वाहू लागले की घरे सोडून पत्रे 50 ते 60 फूट दूर उडून गेले होते.


महत्त्वाच्या बातम्या:


Weather Updates: देशात कुठं उन्हाचा चटका तर कुठं पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज