Sant Nivruttinath Palkhi : आषाढी एकादशीनिमित्त त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथून संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे (Pandharpur) झाले आहे. आज हा पायी दिंडी सोहळा नाशिक शहरात दाखल झाला असून ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. आय सायंकाळी शहरातील गणेशवाडी परिसरातील भाजीमंडई येथे परंपरेने दिंडी विसावणार आहे. त्यादृष्टीने नाशिक मनपाने नियोजन केले आहे. 


संत निवृत्तीनाथांची (Nivruttinath Maharaj) पालखी त्र्यंबकेश्वर येथून शुक्रवारी दोन जूनला पंढरपूरकडे रवाना झाली पहिला मुक्काम शहरातीलच महानिर्वाणी आखाडा गहिनीनाथ समाधी येथे झाला तर दुसरा मुक्काम काल सायंकाळी सातपूर (Satpur) येथे झाला. आज सकाळी ही दिंडी नाशिक शहरात दाखल झाली. त्यानंतर नाशिक पंचायत समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. दरम्यान दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील वारकऱ्यांसाठी भोजन राहण्याची व्यवस्था केली आहे. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी, पताका उभारण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर महिला भाविक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्याचे दिसून आले. आज सायंकाळी ही दिंडी शहरातील गणेशवाडी परिसरातील भाजी मंडई परिसरात मुक्कामी असणार आहे.


जुने नाशिक (Nashik) येथील संत नामदेव विठ्ठल मंदिर व नामदेव शिंपी पंच मंडळाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथून नाशिक शहरातून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे नामदेव शिंपी समाजाकडून स्वागत करण्यात येईल. 130 वर्षांची परंपरा असून यावर्षी देखील जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. त्र्यंबकरोड येथील पंचायत समिती व तरण तलाव येथे पालखीचे व दिंडीतील वारकऱ्यांचे स्वागत करण्यात येऊन भाविकांसाठी भाविकांना पुष्पगुच्छ देऊन खिचडी, फराळ, लाडूसह चहापाण्याची सोय करण्यात आल्याचे दिसून आले. सुमारे दहा हजार वारकऱ्यांना संत भोजन व मुक्कामाची सोय जुने नाशिक येथील नामदेव विठ्ठल मंदिर गणेशवाडी येथील परंपरेने केली आहे.


वारकऱ्यांसाठी 24 तास आरोग्य सेवा


त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी एकादशी पायी दिंडी सोहळ्यात सहभागी सर्व वारकऱ्यांची आरोग्याच्या दृष्टीने 24 तास काळजी घेतली जाईल. यासाठी शहरातील मराठा विद्या प्रसारक संस्थेचे आरोग्य प्रथम पंढरपूरपर्यंत आरोग्य सेवा असल्याची माहिती संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी दिली. त्यामुळे वारकऱ्यांना वेळोवेळी तपासणीसह औषध पुरवठा करण्यात येणार आहे.


नाशिकनंतरचा प्रवास 


दिंडीतील वारकरी मंडळी रोज दिवसा वीस किलोमीटर पायी प्रवास करतात. तर वेळापत्रकाप्रमाणे रात्री नियोजित असलेल्या ठिकाणी मुक्काम करत दिंडी सत्ताविसाव्या दिवशी पंढरपुरात पोहोचते. या दरम्यान चार मुक्कामानंतर पंढरपूर वारी करून पालखी त्र्यंबकेश्वरकडे माघारी येईल. 18 दिवसांचा पायी प्रवास करून 30 जुलैला पालखी त्र्यंबकेश्वरमध्ये परत दाखल होईल. त्र्यंबकेश्वर, सातपूर, नाशिक, पळसे, लोणारवाडी, खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, राजुरी, बेलापूर, राहुरी, डोंगरगन, अहमदनगर, साकत, घोगरगाव मिरजगाव, चिंचोली (काळदाते) कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊर, कंदर, दगडी अकोले, करकंब, पांढरीवाडी, चिंचोली, पंढरपूर.असा पायी दिंडीचा मार्ग असणार आहे.