Nashik Sambhajiraje : स्वराज्याची ताकद वाढवून महाराष्ट्रात नाव करायचंय, किती दिवस मोर्चे आणि आंदोलन करायचे, सामान्य माणसाला ताकद देणं महत्वाचे आहे. त्यामुळे स्वराज्य हे निश्चित राजकारणात येईल आणि 2024 निश्चितच स्वराज्य लढवेल, अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chatrapati) यांनी मांडली आहे.
नाशिकमध्ये (Nashik) संभाजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने आज ते नाशिकमध्ये असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते यावेळी म्हणाले की, स्वराज्य संघटना 2024 च्या निवडणुकीत (Mission 2024) 100 टक्के राजकारणात उतरेल. 2024 हे निश्चित ध्येय असणार असून महाराष्ट्रात जे काही मोठे पक्ष असतील त्यांना आमचा विरोध नसणार आहे. 2024 च्या निवडणुकांसाठी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहोत, असं म्हणत संघटने विषयीची भविष्यातल्या निवडणुकांविषयीची भूमिका संभाजीराजेंनी मांडली.
ते पुढे म्हणाले की, स्वराज्यांनी राजकारणात यावं यासाठी लोकांच्या अपेक्षा आहेत. सामान्य माणूस राजकारणात यायला हवा. पैशांचा प्रभाव आणि घराणेशाही असली की तोच राजकारणात यायला पाहिजे, असं थोडं चालतं. त्यामुळे जनसामान्य माणूस हा राजकारणात येण्यासाठी स्वराज्य हा पर्याय उभा केला आहे. स्वराज्य हे राजकारणात येणार आहे, मात्र अजून कुठले इलेक्शन लढणार हे निश्चित केले नाही. मात्र 2024 हे मिशन निश्चित झाले असून 2024 हे महत्त्वाचं टार्गेट आहे. स्वराज्य कडून महाराष्ट्रातील लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे स्वराज्य मैदानात उतरत आहे, त्यामुळे जनता आता ठरवेल. त्याचबरोबर स्वराज्याची ताकद वाढवून महाराष्ट्रात नाव करायचंय, किती दिवस मोर्चे आणि आंदोलन करायचे, सामान्य माणसाला ताकद देणं महत्वाचे आहे, असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले.
भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजप मिशन 200 ची घोषणा केली. यावर त्यांना विचारले असता संभाजी राजे म्हणाले कि, ते मोठे लोकं आहे..मी त्याविषयी काही बोलू इच्छित नाही..मात्र सामान्य लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा आहे. आम्हाला स्पेस आहे की नाही, हे जनता ठरवेल. त्याचबरोबर स्वराज्य संघटना सर्वांसाठी खुली राहणार असून स्वराज्यसाठी राजकारणातील सर्व पर्याय खुले आहे. स्वराज्य हे एका जातीसाठी नाही, सर्वच अठरा पगड जातीसाठी उघडे असल्याने सामान्य माणूस आमदार, खासदार व्हायला हवा, याच अपेक्षेतून स्वराज्य 2024 ची निवडणूक लढवेल, स्वराज्यचे उमेदवार दिसतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नाशिकच्या लोकांचं माझ्यावर प्रेम...
नाशिकच्या लोकांचं माझ्यावर खूप प्रेम असून नाशिककरांचे मनापासून आभार, कोल्हापूर सोडून माझा वाढदिवस इतर कुठे साजरा केला नव्हता. मात्र कार्यकर्त्यांची भावना होती की, नाशिकमध्ये वाढदिवस साजरा व्हावा आणि म्हणूनच काल वाढदिवस साजरा झाला. जेवढे प्रेम मला कोल्हापूरकर देतात, तेवढे प्रेम नाशिककरांनी दिलं, मन भरून आलं, त्यामुळे मी नेहमीच नाशिकला येत असतो.