Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, कोश्यारी यांच्या राजीनामा मंजूर केल्यानंतर विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील (Jayant Patil), काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan), शिवसेना खसादर अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


Jayant Patil : जयंत पाटील काय म्हणालेत? 


महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे. महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच महाराष्ट्रात नवीन राज्यपाल येणार या वृत्ताचे आम्ही स्वागत करतो असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत, अशी आशा करूयात. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा- सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो ! असं ट्वीट जयंत पाटील यांनी केलं आहे.


Arvind Sawant: आधीच राजीनामा घेणं गरजेचं होतं


देर आए दुरुस्त आए अशा शब्दात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर  प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अवमान राज्यपालांनी केला होता. खरतर तात्काळ त्यांचा राजीनामा घेणं गरजेचं होतं. पण तात्काळ ते केलं नाही असे अरविंद सावंत यावेळी म्हणाले. येणाऱ्या निवडणुकांमध्ये विरोधकांच्या हातात राज्यपालांच्या विरोधातला मुद्दा राहील म्हणून त्यांचा राजीनामा घेतल्याचे अरविंद सावंत म्हणाले. 


Ashok Chavan : प्रत्येक राज्यपालांना काळजी घ्यावी लागेल


राज्यपाल हे घटनात्मक महत्त्वाचे पद आहे. त्यामुळं बोलताना प्रत्येक राज्यपालांना काळजी घ्यावी लागेल. राज्यपालांकडून कोणताही वादग्रस्त वक्तव्य होणार नाहीत. कोश्यारी यांच्या कालावधीत अनेक वादग्रस्त वक्तव्य झाल्याचे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण म्हणाले. आगामी येणाऱ्या राज्यपालांकडून कोणताही वादग्रस्त वक्तव्य होऊ नयेत ही आमची अपेक्षा असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. पदाचे महत्त्व जाणीवपूर्व सांभाळले पाहिजे असे अशोक चव्हाण म्हणाले. 


Amol Mitkari : महाविकास आघाडीच्या आंदोलनाला अखेर यश


उशिरा का होईना अखेर महाराष्ट्रातील घाण गेली. महाविकास आघाडीच्या आंदोलनाला अखेर यश आल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालाच्या अभिभाषणावर महाविकास आघाडी जोरदार विरोध करणार हे भाजपाला कळल्यामुळे मोदीजींनी एकप्रकारे महाराष्ट्रातील सरकारची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.


रमेश बैस (Ramesh Bais) नवे राज्यपाल


महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा (Resignation) मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. 


महत्त्वाच्या बातम्या:


Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल