Nashik Sinnar Temple : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर (Sinnar) जवळील ईशान्येश्वर मंदिर मागील 24 तासांपासून चर्चेत आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिल्यापासून हे मंदिर प्रकाशझोतात आले आहे. नेमकं हे मंदिर कशासाठी प्रसिद्ध आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कशासाठी भेट दिली? मंदिराचे देखभाल करणारे कोण आहेत? असे प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत.
नाशिक जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून मंदिराची नागरी म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील अनेक भागात पुरातन मंदिरे असून ती इतिहासाची साक्ष देतात. अशाच प्रकारे सिन्नर तालुक्यातील गोंदेश्वर मंदिरानंतर (Gondeshwer Mandir) मिरगाव शिवारात सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील ईशान्यश्वेर मंदिर चर्चेत आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे काल शिर्डी दौऱ्यावर असताना साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचा ताफा अचानक सिन्नर रस्त्याला लागला. सिन्नर शहरापासून काही अंतरावर असलेल्या ईशान्येश्वेर मंदिरात त्यांनी दर्शन घेत सपत्निक पूजा केली. त्यानंतर हे मंदिर चर्चेत आले आहे.
नासिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारात सिन्नर - शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर जामनदीच्या तीरावर श्री ईशान्येश्वर (Ishanyeshwer Temple) या नावाने हेमाडपंथी मंदीर आहे. मंदिरातील मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 2010 रोजी संपन्न होऊन हे मंदिर सर्व भाविकांना दर्शनासाठी खुले झालेले आहे. दरम्यान तेव्हापासून या मंदिराची देखभाल कहांडळ्वाडी येथील निवृत्त कॅप्टन अशोककुमार खरात हे पाहतात. या मंदिराची आख्यायिका पाहिली तर असे लक्षात येते कि, मंदिराचे बांधकाम करताना त्या मंदिराच्या बांधकामात ग्रह, तिथी, नक्षत्र, धर्म, संस्कॄती, सदभावना, पवित्रता, मंदिर परीसरात मयुर व कोल्ह्याचा सतत वावर, मंदिरेच्या ऊत्तरेस नदी, मंदिराच्या 200 मीटर परीघात मानवी वस्ती नसल्याचे सांगितले जाते. भाविक भक्तांची इच्छा पूर्ण होणारच, असा भक्तांचा मानस असल्याचे बोलले जाते.
अशोककुमार खरात कोण आहेत?
मंदिराची देखभाल करणारे अशोककुमार खरात हे बी.एस्सी. पदवीधर असुन त्यांनी नौकानयन विभागाचे शिक्षण पुर्ण करुन प्रशिक्षणानंतर पहीले 7 वर्ष भारतीय नौकानयन विभागात व नंतरचे 15 वर्ष ऑस्ट्रेलियन व्यापारी नौकानयन विभागात सबमरीन विभागात कॅप्टन या पदावर 22 नोकरी करून निवृत्त झालेले आहे. त्यानंतर कॅप्टन अशोककुमार यांना राजकीय भविष्य सांगणारे जोतिषीही म्हणून ओळखले जाते. राज्यातील अनेक राजकीय नेते, त्यांच्याकडे भेटीसाठी येत असतात. त्याचबरोबर ईशान्येश्वेर मंदिर समितीवर महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांचा देखील समावेश आहे.
अंनिसचा आरोप
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर अंनिसचे कृष्णा चांदगुडे यांनी देखील आक्षेप नोंदविला आहे. मुख्यमंत्र्यांनी ईशान्येश्वर मंदिरास दिलेली भेट आणि भविष्य पहिले असल्यास ही अत्यंत बेजबाबदार कृती असल्याचे चांदगुडे म्हणाले आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात संविधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा जाहीर निषेध अंनिस करत आहे. ज्योतिष हे शास्र नसून थोतांड आहे. कुणी शास्र असल्याचे सिद्ध केल्यास एकवीस लाखांचे बक्षिस ठेवल्याचे चांदगुडे यांनी सांगितले.