Shalimar Express Fire : नाशिकरोड रेल्वेस्थानकावर धक्कादायक घटना घडली असून नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर (Nashik Road Railway Station) शालिमार-हावडा एक्स्प्रेसच्या (Shalimar Express) इंजिनला आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी नाही, सद्यस्थितीत आग विझविण्याचे काम सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. 


महिनभरापूर्वी नाशिकमध्ये खासगी बसला आग लागल्याची घटना घडली होती. त्या घटनेची सल अजूनही नाशिकसह महाराष्ट्राच्या नागरिकांमध्ये आहे. अशातच आज नाशिकरोड रेल्वे स्थानकात शालिमार एक्सप्रेस पोहचताच पार्सल वाहून नेणाऱ्या गाडीला आग लागली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. आग लागल्याचे माहिती मिळताच लगेचच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तर स्थानिक रेल्वे स्थानकावरील बंबाकडून आग  विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 


आग कशी लागली, याबाबत अद्याप स्पष्ट झाले नसून आग विझवण्याचे काम सुरु आहे. ट्रेन क्रमांक 18030 शालीमार ते एलटीटी ही मुंबईकडे जात असताना नाशिकरोड रेल्वे स्थानकावर थांबली असताना अचानक पार्सल व्हॅनमध्ये आग लागल्याचे निदर्शनास आले. ही बाब रेल्वे प्रशासनास लक्षात येताच आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. सद्यस्थितीत आग नियंत्रणात आहे. कोणत्याही प्रवाशाला/कोणत्याही व्यक्तीला कोणतीही दुखापत नसल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. 



दरम्यान जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार (Shivaji Sutar) यांच्या म्हणण्यानुसार, सद्यस्थितीत इंजिनच्या शेजारी असलेली लगेज कंपार्टमेंट/पार्सल व्हॅन ट्रेनमधून वेगळी करण्यात आली आहे. आणि लवकरच ट्रेन पुन्हा सुरक्षितपणे सुरू होईल. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आज सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास ही आग लागल्याचे त्यांनी सांगितले. 


प्रवाशांची धावपळ
दरम्यान लगेज बोगीला अचानक लागलेल्या आगीमुळे प्रवाशांची धावपळ उडाली. प्रशासनाला तात्काळ माहिती मिळाल्यानंतर आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. मात्र या घटनेमुळे मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून नाशिक रोड रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन चालू राहणार असल्याची माहिती मिळते आहे. रेल्वे स्थानकावरील हेडव्हायर तुटल्या तूर्तास प्लॅटफॉर्म नंबर तीन वर रेल्वेसेवा दुसऱ्या बाजूने वळविण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.