Sant Nivruttinath Palkhi : 'राम कृष्ण हरी, मकुंदा मुरारी, ये ना त नारायण वासुदेव', ज्ञानेश्वर माऊली, द्यानराज माऊली तुकाराम..' असा हरिनामाचा गजर करत राज्यभरातील दिंड्या आज पंढरपूरला पोहोचतील. तर राज्यातील सात दिंड्यापैकी मानाची दिंडी असलेल्या संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपुरात पोहोचली असून विठुरायाची नगरी वारकऱ्यांनी दुमदुमून गेली आहे. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी (Sant Nivruttinath Palkhi) पंढरपूरच्या जवळ असून कालच्या श्री क्षेत्र चिंचोली येथील मुक्कामानंतर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी आज पंढरपुरात दाखल होईल.
अवघ्या काही तासांवर आलेल्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूर नगरी वारकऱ्यांनी न्हाहून निघाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या पंढरपुरात पोहोचत आहेत. अनेक दिंड्यांनी पंढरपुरात दाखल होत पांडुरंगाचं दर्शनही घेतलं आहे. अनेक दिंड्या आज सायंकाळपर्यंत पंढरपूरला (Pandharpur) पोहोचतील. जवळपास पंचवीस दिवसांहून अधिक दिवसांचा पायी प्रवास करत मजल दर मजल करत दिंड्या पंढरपूरला पोहोचत आहेत. भक्तीत तल्लीन झालेले वारकरी, अभंगांच्या गोडीने अन् विठ्ठलाच्या ओढीने एक एक पाऊल पंढरीच्या दिशेने टाकत आहेत. संत मुक्ताबाईंसह (Sant Muktabai) संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघालेली असून मुक्ताबाईंची पहिली मानाची पालखी पंढरपुरात पोहोचली आहे. तर संत निवृत्तीनाथांची पालखी आज पंढरपुरात दाखल होणार आहे. तत्पूर्वी पंढरपूरजवळील इसबावी, वाखरीला सोहळा पार पडणार आहे.
राज्यभरातून निघालेल्या दिंड्या पंढरपुरात पोहचत असल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. अवघ्या काही अंतरावर पंढरपूर असून विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात पोहोचत आहेत. त्यामुळे दिंडीतला वारकरी सुखावला असून विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झाला आहे. कधी एकदाची पांडुरंगाची भेट होतेय, अशी अवस्था वारकऱ्यांची झाली आहे. संत निवृत्तीनाथांची दिंडी आज चिंचोलीहून निघून सायंकाळपर्यंत पंढरपूरला पोहोचणार आहे. या मार्गात दुपारी श्रीक्षेत्र वाखरीला सोहळा रंगणार आहे. याच ठिकाणी दुपारचे जेवण होणार असून पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. दुपारी पाच ते सहा वाजेपर्यंत संत निवृत्तीनाथ पालखी पंढरपुरात दाखल होईल.
नाथांची पालखी पंढरपुराजवळ पोहचली
संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरच्या जवळ पोहोचली असून अवघ्या काही अंतरावर पंढरपूर आहे. आज दुपारी वाखरी येथील सोहळा पार पडल्यानंतर नाथांची पालखी पंढरपुरात पोहोचणार आहे. कालचा मुक्काम पंढरपूरजवळील चंद्रभागेच्या तिरी वसलेल्या चिंचोली गावात झाला. त्यानंतर आज सकाळी पुन्हा दिंडीने पंढरपूरकडे मार्गक्रमण केले. त्यानुसार संत निवृत्तीनाथांची पायी दिंडी आज 440 किलोमीटरचा टप्पा पार करत पंढरपुरात दाखल होईल.
हेही वाचा