Beed Crime News: पती-पत्नीमध्ये झालेल्या वादानंतर, न विचारताच माहेरी जाणाऱ्या पत्नीची पतीने सासुरवाडीत जाऊन चाकूने भोसकून हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने निकाल देत आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सोबतच दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील बोरखेड येथे दोन वर्षांपूर्वी ही घटना घडला होती. यावर निकाल देताना अप्पर सत्र न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी सोमवारी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शहाजी काळे (वय 32 वर्षे, रा. हंगेवाडी, ता. भूम, जि. उस्मानाबाद) असे आरोपीचे नाव असून, नगिणा शहाजी काळे (वय 25 वर्षे) असे मयत महिलेचे नाव आहे.  


बोरखेड येथील नगिणासोबत शहाजीचा घटनेच्या आधी नऊ वर्षापूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर नगिणा ही सासरी नांदण्यास गेली होती. पण, दोघांमध्ये सतत वाद व्हायचे, त्यामुळे त्यांच्यात पटत नव्हते. दरम्यान, शहाजीसोबत वाद झाल्याने नगिणा 8 ऑक्टोबर 2020 रोजी बोरखेड येथे आपल्या माहेरी निघून आली होती. नगिणा माहेरी गेल्याने दोन दिवसांनी म्हणजेच, 10 ऑक्टोबर 2020 रोजी शहाजी काळे देखील सासुरवाडीत गेला. त्यानंतर मला न विचारता तू माहेरी का आलीस? असा जाब विचारत शहाजीने नगिणासोबत वाद घालायला सुरुवात केली.


आरोपी पती पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात सोडून पळून गेला 


वाद एवढा विकोपाला गेला की, शहाजीने नगिणावर चाकूने कानावर हल्ला केला. या हल्ल्यात छातीवर, पोटात सपासप वार केल्याने ती गंभीररीत्या जखमी झाली. मात्र नगिणाला रक्ताच्या थारोळ्यात सोडून शहाजी काळे तिथून पळून गेला. त्यानंतर माहेरच्या लोकांनी नगिणाला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, नगिणाच्या आईच्या फिर्यादीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात शहाजी काळेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर याप्रकरणी तत्कालीन सहायक निरीक्षक लक्ष्मण केंद्रे आणि उपनिरीक्षक किशोर काळे यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.


यांच्या साक्षी ठरल्या महत्वाच्या...


तर हे प्रकरण अपर सत्र न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्यासमोर सुनावणीसाठी आले होते. यावेळी सरकार पक्षाने एकूण 14 साक्षीदार तपासले. ज्यात तपास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, फिर्यादी, तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या होत्या. विशेष म्हणजे, घटनास्थळी आढळलेले पुरावे, न्यायवैद्यक चाचणी अहवाल देखील आरोपी काळेला शिक्षेपर्यंत पोहोचवण्यास महत्त्वाचा ठरला. दरम्यान, यात सरकारी वकील अनिल धसे यांचा युक्तिवाद, साक्षीपुरावे ग्राह्य धरून न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी आरोपी शहाजी काळेला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा आणि दहा हजार दंड ठोठावला आहे.  


महत्वाच्या इतर बातम्या: 


Beed Crime: अनैतिक संबंधातून दोघांची आत्महत्या; बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना