Nashik Crime : अनेकदा फोन हरविण्याच्या घटना घडत असतात, मग कुठे रस्त्यात, बसमध्ये, अगदी कुठेही. मात्र अनेकदा हे मोबाईल सापडत नाहीत. पण काहीवेळा माणुसकीमुळे अनेकजण मोबाईल (Mobile) परत करतात. पण नाशिकमध्ये (Nashik) हेच मोबाईल परत करणे एका युवकाला महागात पडले आहे. सापडलेला मोबाइल परत देण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण करण्यात आली होती. मात्र उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 


आज प्रत्येकाजवळ स्मार्ट फोन आहे, मात्र एकदा हरवला की परत मिळणे कठीण होऊन बसते. तर काहीवेळा अनेक अनोळखी माणसे स्वतःहून मोबाईल परत करत असतात. नाशिकमध्ये (Nashik City) याउलट घटना घडली आहे. सापडलेला मोबाइल परत घेण्यासाठी गेल्यानंतर दोघांमध्ये झालेल्या वादातून नितीन जाधव या तरुणाला लोखंडी सळईने मारहाण करुन गंभीर जखमी करण्यात आले होते. त्याचा रविवारी (23 एप्रिल) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात मयत युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तिघा संशयितांवर खुनाचा (Murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर या प्रकरणातील दोघा संशयितांना अटकही करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत नितीन गणपत जाधव (Nitin Jadhav) यास गेल्या 07 एप्रिल रोजी एक मोबाइल सापडला होता. हा मोबाईल परत घेण्यासाठी गेलेल्या तिघांनी वाद घालत नितीन यास मारहाण केली. यात निलेश ठोके त्याचा साथीदार प्रसाद शिरीष मुळे आणि अन्य एका साथीदाराने वाद घालून लोखंडी सळईने मारहाण केल्याने नितीन जाधव गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार सुरु असताना रविवार अखेर त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी मयत नितीन जाधव यांचे वडील गणपत जाधव यांच्या फिर्यादीहून अंबड पोलीस ठाण्यात जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र नितीन जाधव मयत झाल्याने अंबड पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर अधिक तपास करत आहे.


नोकरी शोधायला आला होता... 


मूळचा नांदगाव (Nandgaon) तालुक्यातील हिसवळ येथील असलेला नितीन जाधव हा नोकरीच्या शोधात नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीत आला होता. याच दरम्यान त्यास एक मोबाईल सापडला. मोबाईल चालू असल्याने संबंधित मोबाईल मालकाचे म्हणजेच ठोके यांचे फोन या फोनवर येत होते. या दरम्यान नितीनला संशयित पल्लवी यांनी त्यांच्या मोबाईलवरुन फोन केला. यानंतर नितीनने पुढील कॉल पल्लवी यांच्या मोबाईलवर केले. यावेळी नितीनने आक्षेपार्ह संवाद साधल्याचा संशयितांचा आरोप आहे. मोबाईल घेण्यासाठी नितीनला त्रिमूर्ती चौकात बोलावून घेत ठोके दाम्पत्याने साथीदारांसह हल्ला केला. 


खुनाचा गुन्हा दाखल 


दरम्यान या संशयितांनी नितीन यास लोखंडी रॉडने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. यानंतर त्यास नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिव्हिलमध्ये उपचार केल्यानंतर एमआरआय करण्यासाठी त्याला आडगाव जवळील मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईलवरुन झालेल्या किरकोळ वादातून प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले आणि त्यातूनच तरुणाला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे.