Nashik News : आई म्हटलं कोणत्याही संकटावर मात करुन आपल्यासाठी हाताचा पाळणा करत असते. आपल्या मुलांसाठी कोणताही धोका पत्करुन त्यांना वाढवत असते. मात्र अशात जर मुलगा आईला सोडून गेल्यास आईसारख दुःख कुणालाच होत नाही. असाच काहीसा प्रकार नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नरमध्ये घडला आहे. सिन्नर (Sinnar) तालुक्यातील निऱ्हाळे-फत्तेपुर येथील सांगळे कुटुंबातील मुलाचे नवी मुंबई निधन झाल्याची वार्ता समजताच गावी असणाऱ्या आईला हृदयविकाराचा तीव्र धक्क्याने निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 


काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात (Nashik City) आईच्या धाडसाचे कौतुक करणारी (Mother Love) बातमी समोर आली होती. या आईने आपल्या घरात अडकलेल्या बाळासाठी जीव धोक्यात घालून बाळापर्यंत पोहचली होती. या अशा घटनांवरुनच आईच आपल्या बाळाप्रती असलेले प्रेम दिसून येत. सिन्नरच्या घटनेतही असंच काहीसं घडलं आहे. निर्हाळे फत्तेपूर (Nirhale Fattepur) येथील रहिवासी शिवराम फकिरबा सांगळे हे सध्या नवी मुंबईत राहायला होते. सांगळे हे मुबंई येथील अधीक्षक शिक्षण निरीक्षक विभागातून चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. काही दिवसांपासून ते पॅरालिसिसच्या आजाराने त्रस्त असताना बुधवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. नातेवाईक त्यांचे शव मुंबईवरुन अंत्यविधीसाठी निऱ्हाळे येथे आणत असताना आई ठकुबाई यांच्या कानावर ही वार्ता गेली. त्यानंतर काही वेळातच हृदयविकाराचा झटका आल्याने आईनेही प्राण सोडले. 


दरम्यान सकाळी सांगळे यांचे निधन झाल्यानंतर अंतिम विधीसाठी त्यांचे शव गावाकडे आणण्यात येत होते. यावेळी गावी भाऊ, भावजया आणि आई होते. मात्र मुलाच्या निधनाची वार्ता 95 वर्षीय आई ठकूबाईंना कळवली गेली नव्हती. मात्र, घराकडे येणारे नातेवाईक आणि काही उपस्थितांना रडू न आवरल्याने ही वार्ता ठकूबाई यांना समजल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला अन् त्यांचेही निधन झाले. त्यामुळे सांगळे कुटुंबीयांवर दुःखाचा दुहेरी डोंगर कोसळला आहे. मुलापाठोपाठ आईनेही जीव सोडल्याने गाव परिसरात हळहळ व्यक्त होऊ लागली. 


एकाच वेळी अंत्यसंस्कार 


दरम्यान स्मशानभूमीवर मुलगा शिवराम यांच्या अंत्यविधीसाठी अवघा गाव जमला होता. त्यांच्या अत्यंविधीची तयारी सुरु असताना आईच्या रुपात दुसरा डोंगर सांगळे कुटुंबियांवर कोसळला. आई आणि मुलगा यांच्या एकाच दिवशी झालेल्या निधनाने नातेवाईक आणि ग्रामस्थांवर शोककळा पसरली होती. यानंतर जाम नदीवरील स्मशानभूमीत आई आणि मुलावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. परिसरातील ही पहिलीच घटना असल्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू येत होते. शिवराम यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, भाऊ, भावजया, नातवंडे, पुतणे, सूना असा मोठा परिवार आहे. या अगोदरही दोन वर्षांपूर्वी शिवराम यांचा छोटा भाऊ प्रदीप याचेही हृदयविकाराने निधन झालेले आहे. आता आई आणि मुलाचे एकच दिवशी निधन झाल्याने सांगळे कुटुंबावर पुन्हा दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.