Nashik News : नाशिकमध्ये(Nashik) श्वानांच्या लसीकरणाची (Dog Vaccination) विशेष मोहीम राबविण्यात येत असून लंडनहून (London) आलेल्या चालत्या फिरत्या ट्रकमध्ये रुग्णालय उभारलं आहे. नाशिक शहरातील विविध ठिकाणी जाऊन पाळीव तसेच भटक्या श्वानांचे रेबीजचे (Rabies) लसीकरण करण्यात येत आहे. सध्या या चालत्या फिरत्या रुग्णालयाला नाशिककरांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. 


हल्ली आजारपण हे काही नवं नाही, माणसांबरोबर पाळीव प्राणीही वातावरणातील बदलामुळे अथवा इतर कारणांमुळे आजारी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच आपल्यापैकी अनेकांच्या घरी असणाऱ्या श्वानालाही अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यापैकीच एक म्हणजे रेबीज. या रेबीजच्या समूळ उच्चाटनासाठी नाशिकमध्ये विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून शहरातील कानाकोपर्‍यात पोहचून भटक्या तसेच पाळीव कुत्र्यांना रेबीज आजारावरील लस दिली जात आहे. वर्ल्ड वेटीनरी सर्विस, मिशन रेबिझ आणि अ‍ॅनिमल वेल्फेयर अँड अँटी हॅरॅशमेंट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने नाशिक शहरात पुढील दीड महिना एक विशेष उपक्रम राबवला जाणार आहे.


दरम्यान इतर आजाराप्रमाणेच रेबीज आजारचे प्रमाण आजही शहरामधील अनेक भटक्या कुत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. याच रेबीजचे समूळ उच्चाटनासाठी नाशिकमध्ये ही मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी लंडन येथून सात कोटींचा वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असा भव्य ट्रक नाशिक शहरात दाखल झाला आहे. मर्सिडिझ कंपनीची ही ट्रक असून ट्रकला थेट एका चालत्याफिरत्या रुग्णालयात रूपांतरित करण्यात आले आहे. या भव्य ट्रकमध्ये अगदी तपासणी आणि प्रशिक्षण कक्ष ते ऑपरेशन थेटर आणि वायू भूलशस्त्र अशा सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून नाशिक शहरातील गंगापूर रॉड, सिडको, पाथर्डी फाटा, नाशिकरोड, पंचवटी आदी महत्वाच्या ठिकाणी दाखल करून या ठिकाणच्या श्वानांना रेबीजचे लसीकरण करण्यात येणार आहे. 


चालते फिरते रुग्णालय 
लंडनहून आलेला हा सात कोटींचा सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेला हा ट्रक अद्ययावत आहे. या ट्रकमध्ये अख्ख रुग्णालय उभं करण्यात आले असून यामध्ये एक्सरे मशीन, लॅब, कोल्ड स्टोरेज, ऑक्सीजन मशीन अश्या अनेक अत्याधुनिक आणि अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. आतापर्यंत शंभरहून अधिक श्वानांना लसीकरण करण्यात आले असून तीन श्वानांवर यशस्वी शस्रक्रिया करण्यात आली आहे. आपल्या घरच्या पाळीव कुत्र्यांना किंवा आपल्या आसपासच्या परिसरातील कुत्र्यांना जर रेबीजचे लक्षणे दिसली तर संबंधित पशुवैद्यकांशी संपर्क साधा आणि आपल्या पाळीव प्राण्यांचा जीव वाचवा अशी प्रतिक्रिया प्राणीप्रेमी गौरव क्षेत्रीय यांनी दिली आहे.


रेबीजची लक्षणे काय?
नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणाहून प्रतिसाद मिळत असून अनेक फोन कॉल्स देखील येत आहेत. तर गौरव क्षेत्रीय यांनी सांगितले कि, ज्या श्वानांमध्ये सतत लाळ गळणे, मलूल पडून राहणे, हालचालींवर ताबा नसणे, ताप येत राहणे, निद्रानाश, पाण्याची भीती वाटणे नाकातून डोळ्यांतून आणि कानांतून पस तत्सम घाण पाणी बाहेर येणे. तसेच उगाचच भुंकणे अथवा भुंकायचा प्रयत्न करणे अशी लक्षणे दिसत असल्यास त्वरित लस घ्या, शिवाय आमच्याशी संपर्क साधत योग्य उपचार करण्याचे आवाहन यामोहिमेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.