Nashik Suhas Kande : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचा वाद काही नवा नाही. आता मदार सुहास कांदे यांनी भुजबळांबाबत नवं वक्तव्य केल्याने राजकारण तापण्याची शक्यता आहे. 'छगन भुजबळ माझ्यासाठी शून्य माणूस असून माझ्यासमोर त्यांनी कधीही उभं राहावं, माझं त्यांना तुमच्या माध्यमातून थेट आव्हान' असल्याचं शिवसेना आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी एबीपी माझाशी बोलतांना म्हटलं आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


सुहास कांदे यांना विजयाचा विश्वास


आज मनमाड बाजार समितीसाठी (Manmad Bajar Samiti) मतदान होत असून या पार्श्वभूमीवर सुहास कांदे मतदान केंद्रावर तळ ठोकून आहेत. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ माझ्यासाठी शून्य माणूस असून माझ्यासमोर त्यांनी कधीही उभं राहावं, माझं त्यांना तुमच्या माध्यमातून थेट आव्हान असल्याचं शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज मतदान होत असून आमदार सुहास कांदे यांच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनल विरुद्ध तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पाच माजी आमदारांच्या महाविकास आघाडी परिवर्तन पॅनलमध्ये इथे लढत होत आहे. छगन भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळ यांचाही यात समावेश असून भुजबळ कुटुंबियांनीच यात चांगला जोर लावला आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. विकासाच्या मुद्द्यावरुन मतदार आमच्या पॅनलला विजयी करतील असा विश्वास कांदे यांनी व्यक्त केला आहे. 


राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचा वाद काही नवा नाही. अनेक वर्षांपासून दोघांमध्ये चकमक पाहायला मिळत आहे. सत्तांतर झाल्यानंतर यात आणखी वाढ होत जाऊन दोन्ही नेत्यांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप केल्याचे दिसून आले आहेत. अशातच नुकताच नाशिक जिल्ह्यातील बारा बाजार समित्यांचा निकाल हाती आल्यानंतर महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्याचे नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या बाबतीत भाजप-शिंदे गटाला इशारा असल्याचे माविआ नेत्यांकडून बोलले जात आहे. 


माझ्यासमोर निवडणुकीला कधीही उभं राहावं.. 


दुसरीकडे बाजार समित्यांची निवडणूक झाली असली तरी आमदार सुहास कांदे यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदगाव आणि मनमाड बाजार समितीचा निकाल अद्याप बाकी आहे. नांदगाव बाजार समिती निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर मनमाड बाजार समितीची निवडणूक मतदान प्रक्रिया सुरु आहे. सायंकाळी ही मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर नांदगाव बाजार समितीची निवडणूक मतमोजणी सुरु होणार आहे. त्यानंतर या बाजार समितीवर कुणाचा झेंडा असणार हे स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांना निवडणुकीला उभे राहण्याचे ओपन चॅलेंज दिले आहे.