Nashik News : आपल्या जवळच्या नात्यातील व्यक्तींचे निधन झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी किंवा अंत्यंसंस्कार करताना कुटुंबीय अतिशय संवेदनशील असतात. मात्र आता अनेकजण रुढी परंपरांना फाटा देत नवा आदर्श घालून देण्याचा प्रयत्न करत असतात. नाशिकमधील (Nashik) चांदगुडे कुटुंबियांनी देखील कर्मकांडाला फाटा देत निधन झालेल्या आईचे मरणोत्तर देहदान (organ donation) केले आहे. 


नाशिक (Nashik) येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांच्या आई सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे यांचे आजारपणामुळे गुरुवारी निधन झाले. त्यांचे वय 83 वर्ष होते. त्यांनी मरणोत्तर देहदान केले. त्यांचा देह डाॅ वसंतराव पवार मेडिकल काॅलेजला देण्यात आला. त्यांचे कोणतेही कर्मकांड करणार नसल्याची माहिती चांदगुडे कुटुंबाने दिली. विधवा प्रथा निर्मूलनाचे शासनाने परिपत्रक काढल्यानंतर महाराष्ट्रात प्रथमच सुगंधाबाई यांनी त्याची अंमलबजावणी केली होती. विधवा असूनही त्यांनी टिकली ,मंगळसूत्र, जोडवे परिधान केले होते. चांदगुडे कुटुंबियांनी याआधीही अनेक पुरोगामी निर्णय घेऊन समाजाला आदर्श घालून दिला आहे.


दरम्यान कृष्णा चांदगुडे (Krushna Chandgude) हे नेहमीच आपल्या विविध कृतीतून समाजाला नवा संदेश देण्याचे काम करतात. यावेळी त्यांनी जुन्या रुढी परंपरा आणि कर्मकांडांना फाटा देत आईच्या मृतदेहावर कुठल्याही प्रकारे अंत्यविधी न करता देहदान करण्याचा निर्णय घेतला. नाशिक येथील मेडिकल कॉलेजला आईचा देह सुपूर्द केला. आई सुगंधाबाई यांची आदरांजली सभा 12 फेब्रुवारी रोजी त्यांच्या कोपरगाव तालुक्यातील चासनळी या गावी ठेवण्यात आली आहे. यावेळी 'देहदान व अवयवदान, काळाची गरज'  या विषयावर अवयवदान चळवळीचे कार्यकर्त सुनील देशपांडे यांचे व्याख्यान होणार आहे. या प्रसंगी मरणोत्तर देहदानाची इच्छा असणाऱ्या व्यक्तींचे फाॅर्म भरून घेणार असल्याचे कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले.


अवयवदान हेच सर्वश्रेष्ठ दान


हल्ली अनेकजण आपल्या कृतीतून अनेकांना मदत करत असतात. तुम्ही केलेली मदत एखाद्याला नवी उभारी देण्याचे करत असते. तसेच मृत्यनंतर केलेले देहदान देखील एखाद्या व्यक्तीसाठी नवे जीवन देणारे असते. किंवा तुम्ही दिलेला अवयव एका व्यक्तीचे नाही तर अनेक व्यक्तींच्या जीवनात आनंद पेरण्याचे काम करू शकतो. त्यामुळेच हल्ली अनेकजण अंत्यविधी न करता आपल्या कुटुंबियांचे नातेवाईकांचे अवयवदान करत असतात. अवयवदान हे जिवंत असताना आणि मृत्यूनंतर अशा दोन्ही वेळी करता येते. एक व्यक्ती मृत्यूनंतर अवयवदान केल्यास 8 जणांना नवे जीवन मिळते.