Suhas Kande : कुणीच नाराज नाही रे राजा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर नितांत प्रेम असल्यामुळे त्यांच्या सोबत आहे. शिवाय त्यांनी दिलेल्या निमंत्रणामुळे आज कामाख्या देवीच्या (Kamakhya Devi) दर्शनाला जात आहे. त्यामुळे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आम्ही जात असल्याची प्रतिक्रिया नांदगावचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी दिली. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आमदारांसह आज गुवाहाटीला (Guwahati) दर्शनासाठी गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह आमदार मुंबई विमानतळावरुन गुवाहाटीच्या दिशेनं रवाना झाले. गेल्या काही दिवसांपासून हा दौरा चर्चेत होता. अखेर आज आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा एडकेहील कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते. या दौऱ्यासाठी नांदगावचे आमदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सुहास कांदे हे देखील कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले आहेत. यावेळी त्यांनी काही क्षण माध्यमांशी संवाद साधला. 


एकीकडे नाशिकमध्ये (Nashik) शिंदे गटातील नेत्यांमध्ये 'का रे दुरावा' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण एकमेकांच्या बैठकीला किंवा कार्यक्रमाला हे तिन्ही नेते दिसून येत नसल्याने नाशिकच्या शिंदे गटात काहीतरी शिजतंय असा समज निर्माण झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर दुसरीकडे आज सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार गुवाहाटीला दर्शनासाठी गेले. या आमदारांमध्ये मंत्री दादा भुसे, नांदगावचे आमदार सुहास कांदे हे देखील दर्शनासाठी गेले. यावेळी विमानतळावर असताना सुहास कांदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिले असून त्यासाठी कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आलो आहे. तसेच मी काही वनराज नसून मला फक्त माझ्या मतदारसंघाची सेवा करायची आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर नितांत प्रेम असून मला मंत्री पद नको आहे..नांदगाव मतदारसंघाचा विकासासाठी शिंदे साहेबांसोबत आहे. 


ते पुढे म्हणाले, आज अनेक दिवसांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दौरा करत आहोत, पाच महिन्यापूर्वी कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. दरम्यान कामाख्या देवीकडे कुठले सांकडे घालणार? याबाबत कांदे म्हणाले कि, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्यासाठी, महाराष्ट्र्र देशात नंबर वन येण्यासाठी कामाखाय देवीला साकडे असल्याचे कांदे म्हणाले. 


सुहास कांदे नाराज? 
दरम्यान काही दिवसांपूर्वी सुहास कांदे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले होते. नाशिकमधील नेत्यांकडून कुठलीही विचारणा होत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता. कुठल्याची बैठकीची माहिती मिळत नाही, म्हणूनच बैठकीला अनुपस्थित राहतो. शासन, जनसंपर्क आधिकारी यांच्याकडून माहिती मिळत नाही. महत्वाच्या बैठकांना का बोलवलं जात नाही. शिवाय जिल्ह्याच्या पक्ष प्रमुख कोणीतरी असतो, नाशिकच्या शिंदे गटाचा बॉस कोण हेच मला माहिती नाही, असा सवालही त्यावेळी सुहास कांदे यांनी उपस्थित केला होता.