Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात गुन्हेगारीचे (Crime) सत्र थांबायचे नाव घेत नसून दिवसाढवळ्या नागरिकांना रस्त्यावरून चालणे मुश्किल झाले आहे. नाशिक शहराचा महत्वपूर्ण भाग असलेल्या नाशिकरोड परिसरात जुन्या भांडणाची कुरापत काढून वडापाव विक्रेत्यावर (Wadapav) कोयताधारी टोळक्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात दहशत पसरली असून याप्रकरणी उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी नाशिक शहर हादरत आहे. प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, टोळकेच्या टोळके सर्रासपणे हातात चॉपर, कोयते घेऊन रस्त्यावर फिरत आहेत. अशातच नाशिकरोड परिसरात जुन्या भांडणाची कुरापत काढून वडापाव विक्रेत्यावर टोळक्याने हल्ला केला आहे. यात हल्ल्यात वडापाव चालक गंभीर जखमी असून यानंतर टोळक्याने परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने परिसरात शांतता निर्माण झाली. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळू खेलूकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विशाल गणपत गोसावी या युवकाचा टिळक पथ येथे वडापाव विक्रीचा गाडा आहे. नेहमीप्रमाणे विशाल व त्याचे कामगार ग्राहकांना वडापाव देत असताना अचानकपणे मयूर जानराव, तुषार जाधव, कमलेश जानराव, दिनेश खरे, मोगल दाणी यांनी सदर ठिकाणी हातात कोयते व रामपुरी चाकू घेऊन दहशत निर्माण करत गोसावी यास गंभीर जखमी केले. तत्पूर्वी याच टोळक्याने देवळाली गाव येथील बाबू गेनू रोडवर हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करून आजूबाजूच्या घरावर दगडफेक केली व एका चार चाकी वाहनाची तोडफोड केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी टोळके फरार झाले होते. दरम्यान विशाल गोसावी यांच्या तक्रारीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


नाशिककर असुरक्षित ?
दरम्यान, वडापाव विक्रेत्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलीस संबंधित आरोपींचा शोध घेत आहे. तसेच देवळाली गाव येथेही संबंधित टोळक्याने दहशत निर्माण केली. या घटनेमुळे देवळाली गाव व परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सध्या गंभीर झाला आहे. खरं तर धार्मिक आणि शांत म्हणून नाशिक शहराची ओळख मात्र गेल्या काही महिन्यांपासून वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटना बघता हिच नाशिकची ओळख बदलणार तर नाही ना अशी भिती व्यक्त केली जात आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचकच राहीला नसल्याने नाशिककर सध्या भयभीत आहेत.