Nashik Igatpuri Fire : इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील मुंढेगाव परिसरात असलेल्या जिंदाल कंपनीला आग लागल्याची घटना घडली. जिंदाल पॉलिफिल्म (Jindal Polyfilm) ही कंपनी यापूर्वी देखील अनेकदा वादात सापडली आहे. दीड वर्षांपूर्वी या कंपनीत काम करणाऱ्या आंदोलक कर्मचाऱ्यांवर लाठीमार करण्यात आला होता. अनेक घटनांनी ही कंपनी नाशिक जिल्ह्यात चर्चेत असते. 


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरी परिसरात मुंढेगाव (Mundhegaon) येथील जिंदाल कंपनीत आगीची भीषण घटना घडली. या आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून 17 कामगार जखमी असून त्यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशातच जिंदाल कंपनीबाबत कामगार वर्ग आणि कामगार संघटनांनी देखील रोष व्यक्त केला आहे. यापूर्वी देखील जिंदाल कंपनीत आग लागल्याची घटना घडली होती. 


दीड वर्षापूर्वी कंपनीतील कामगारांनी संप पुकारला होता. तेव्हा कंपनीतच 400 ते 500 कामगारांवर लाठीमार झाल्याची घटना घडली होती. मात्र कंपनीतील घडामोडी बाहेर कळू दिल्या जात नाहीत, लहान-मोठे अपघात दाबून टाकले जातात, कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जात नाही, असा आरोप देखील येथील कामगारांनी केला आहे. कंपनीच्या या दबाव तंत्राबाबत स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा कामगार संघटनेचा आरोप आहे. तसेच कंपनीत कामगार संघटना स्थापन करू दिली जात नाही. बहुतांश कामगार परप्रांतीय  असल्याने कंपनीच्या कारभारावर विरोधात आवाज उठवला जात नसल्याचे समजते आहे. 


इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरात 1992 च्या दरम्यान जिंदाल पॉलिफिल्म कंपनीची प्रकल्प सुरू करण्यात आला. या कंपनीत पॉलिफिल्म्स तयार केल्या जातात. बोपेट व बोप असे पॉलिफिल्मचे दोन प्रकार असून दोन्ही प्रकारच्या पॉलिफिल्म्स जिंदाल कंपनीत तयार केल्या जातात. पॅकेजिंग, लेबलिंगव लॅमिनेशन आदी कामासाठी या पॉलिफिल्म वापरल्या जातात. जिंदाल मध्ये सुरवातीपासून बहुतांश परप्रांतीय कामगारच काम करत आहेत. हे सर्व कामगार कंपनीजवळील वस्तीवर वास्तव्यास आहेत. सध्या कंपनीत सुमारे अडीच ते तीन हजार कामगार कार्यरत असल्याचे सांगितले जाते. त्यापैकी अवघे शंभर ते दीडशे कामगार स्थानिक आहेत. कंपनीत यापूर्वीही अनेक छोटे मोठे अपघात घडले असून काही वर्षांपूर्वी आगीची घटना घडली होती. तर विशेष म्हणजे कोरोना काळात सर्व कंपन्या बंद असताना या कंपनीत मात्र उत्पादन सुरू होते, कामगार संघटना याबाबत तक्रार देखील केल्याचे सांगितले जाते. 


आपदा मित्रांचीही मदत झाली... 
आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्य करता यावे यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात 500 आपदा मित्र नियुक्तीचा निर्णय घेतला. 25 जणांच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून सध्या दुसऱ्या बॅचचे प्रशिक्षण सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे हे दुसऱ्या बॅचमधील 24 जणांना परिसरात ट्रेकच्या सरावासाठी घेऊन गेले होते. दुपारी देशपांडे यांना आकाशात धुराचे लोट दिसल्यानंतर तहसीलदार परमेश्वर कासोळे यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. यावेळी कसोळे यांनी कंपनीत आग लागली असल्याची माहिती दिली. देशपांडे हे मुंढेगाव येथील कंपनीच्या परिसरात मित्रांसह पोचले. तेथे बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. या गर्दीला पांगवण्याची जबाबदारी या आपल्या मित्रांनी पार पाडली. निवासी उप जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे हे देखील पूर्णवेळ कंपनीच्या आवारात थांबून यंत्रणांशी समन्वय साधत होते.


सिन्नरच्या कंपनीतील स्फोट...
दरम्यान जिंदाल कंपनीतील भीषण आग प्रकरण घडले. याचसारखी घटना सिन्नर तालुक्यातील पासते येथे काही वर्षांपूर्वी घडली होती. जिंदाल कंपनीतील भीषण स्फोटाच्या घटनेने सिन्नर येथील भयावह घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या. सिन्नर येथील पास्ते येथील एका जिलेटीन कंपनीत 2007 साली रात्रीच्या सुमारास भीषण स्फोट झाल्याची घटना घडली होती. स्फोटाचा आवाज इतका होता की, नाशिकपर्यंत आवाज ऐकू आल्याचे सांगितले जाते. या स्फोटात वीसहुन अधिक कामगारांचा मृत्यू झाला होता. तर अनेक कामगार जखमी झाले होते.